सामनावीर अश्विनची अष्टपैलू चमक, जैस्वालचे अर्धशतक, मोईन अलीचे अर्धशतक वाया
वृत्तसंस्था/ मुंबई
सामनावीर रविचंद्रन अश्विनने पुन्हा एकदा फलंदाजीतील आपली उपयुक्तता दाखवत केलेली नाबाद 40 धावांची खेळी आणि सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या अर्धशतकामुळे राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपरकिंग्सचा आयपीएलमधील आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात 5 गडय़ांनी पराभव करून गुणतक्त्यात 18 गुणांसह दुसरे स्थान मिळविले. येत्या मंगळवारी राजस्थानची पहिली प्लेऑफ लढत गुजरात टायटन्सविरुद्ध होणार आहे.

प्रथम फलंदाजी करताना मोईन अलीने झळकवलेल्या जलद 93 धावांमुळे चेन्नई सुपरकिंग्सने 20 षटकांत 6 बाद 150 धावा जमविल्या. त्यानंतर राजस्थान रॉयल्सने 19.4 षटकांत 5 बाद 151 धावा जमवित नववा विजय साकार केला. अश्विनने 23 चेंडूत नाबाद 40 धावा काढताना 2 चौकार, 3 षटकार मारले. युवा खेळाडू जैस्वालने राजस्थानला जलद सुरुवात करून देताना 44 चेंडूत 8 चौकार, एक षटकारासह 59 धावा फटकावल्या. सॅमसनसमवेत त्याने दुसऱया गडय़ासाठी 51 धावांची भर घातली. पडिक्कल (3) व हेतमेयर (6) लवकर बाद झाले. 17 व्या षटकात हेतमेयर बाद झाला तेव्हा राजस्थानच्या 5 बाद 112 धावा झाल्या होत्या. पण अश्विनने संयमी खेळ करीत रियान परागसमवेत शेवटच्या षटकात विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. चेन्नईच्या सोळंकीने 2 तर सिमरजीत, सँटनर, मोईन अली यांनी एकेक बळी टिपले.
या सामन्यात पहिले षटक संपल्यानंतरच राजस्थान नेट रनरेटच्या आधारे प्लेऑफसाठी क्वॉलिफाय झाले होते. आता चौथ्या स्थानासाठी आरसीबी व दिल्ली यांच्यात चुरस असेल. या स्पर्धेत आतापर्यंत ऑरेज कॅप धारण करणाऱया बटलरला फक्त 2 धावा काढता आल्या.
चेन्नईला यावेळी संघर्षच करावा लागला असून या सामन्यातही प्रथम फलंदाजी निवडल्यावर प्रारंभापासूनच त्यांच्या पडझडीला सुरुवात झाली. मोईन अली, कॉनवे व कर्णधार धोनी या तिघांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. मोईनने चमकदार फलंदाजी करीत 19 चेंडूत 50 धावा फटकावल्या. पॉवरप्लेच्या सहा षटकाअखेर त्याने 24 चेंडूत 59 धावा फटकावल्या होत्या. पहिल्याच षटकात ऋतुराज गायकवाड (2) बाद झाल्यानंतर कॉनवे व मोईन अली यांनी आठव्या षटकात 1 बाद 85 धावांपर्यंत मजल मारून दिली, त्यावेळी ते मोठी धावसंख्या उभारतील असे वाटले होते. अष्टपैलू मोईनने जोरदार फटकेबाजी करताना ट्रेंट बोल्टच्या एका षटकात 26 धावा झोडपत त्याचे पृथक्करण बिघडवून टाकले. मोईनने 57 चेंडूत 13 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 93 धावा फटकावल्या. पण कॉनवे 16 धावा काढून बाद झाल्यानंतर राजस्थानच्या गोलंदाजांनी पुनरागमन करताना चेन्नईच्या जगदीशन, अम्बाती रायुडू यांना झटपट बाद झाले आणि 1 बाद 85 वरून 4 बाद 95 अशी त्यांची स्थिती झाली. चेन्नईच्या फलंदाजांना तब्बल 45 चेंडूत एकही चौकार नोंदवता आला नव्हता. धोनीने चहलला चौकार ठोकून ही कोंडी फोडली. मात्र धोनीलाही जलद धावा करता आल्या नाहीत. त्याने 28 चेंडूत 26 धावा जमविल्या. मोईन अली शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर बाद झाला. चहल व मकॉय यांनी प्रत्येकी 2 तर बोल्ट व अश्विन यांनी एकेक बळी मिळविला.
संक्षिप्त धावफलक ः चेन्नई सुपरकिंग्स 20 षटकांत 6 बाद 150 ः गायकवाड 2, कॉनवे 16 (14 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), मोईन अली 93 (57 चेंडूत 13 चौकार 3 षटकार), धोनी 26 (28 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), अवांतर 5. गोलंदाजी ः चहल 2-26, मकॉय 2-20, अश्विन 1-28, बोल्ट 1-44, प्रसिद्ध कृष्णा 0-32.
राजस्थान रॉयल्स 19.4 षटकांत 5 बाद 151 ः यशस्वी जैस्वाल 59 (44 चेंडूत 8 चौकार, 1 षटकार), बटलर 2, सॅमसन 15 (20 चेंडूत 2 चौकार), पडिक्कल 3, आर.अश्विन नाबाद 40 (23 चेंडूत 2 चौकार, 3 षटकार), हेतमेयर 6, रियान पराग नाबाद 10 (10 चेंडूत 1 चौकार), अवांतर 16. गोलंदाजी ः प्रशांत सोळंकी 2-20 सिमरजीत सिंग 1-18, सँटनर 1-15, मोईन अली 1-21, मुकेश चौधरी 0-41, पथिराना 0-28.









