वृत्तसंस्था/ शारजाह
बेन स्टोक्स व बटलरच्या गैरहजेरीने काहीसा कमकुवत झालेल्या राजस्थान रॉयल्स संघाला मंगळवारी आयपीएलमधील लढतीत बलाढय़ चेन्नई सुपरकिंग्सला रोखण्याचे कठीण आव्हान पेलावे लागणार आहे. मात्र स्टीव्ह स्मिथ कन्कशन (मेंदूला आघात झाल्यानंतर होणारी आकडी) दुखापतीतून बरा झाला असल्याने तो राजस्थान संघाचे नेतृत्व करणार आहे, ही त्यांच्यासाठी समाधानाची बाब असेल. सायंकाळी 7.30 पासून सामन्याला सुरुवात होईल.
स्टोक्सच्या गैरहजेरीमुळे रॉयल्सच्या मोहिमेवर निदान स्पर्धेच्या पूर्वार्धात तरी मोठा परिणाम होणार आहे. कारण त्याच्या असण्यामुळे संघात समतोलपणा असतो. मात्र स्मिथ खेळणार असल्याने ही लढत एकतर्फी होणार नाही, असे निश्चितपणे म्हणता येईल. इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतही स्मिथ खेळू शकला नव्हता. मँचेस्टरमध्ये पहिल्या वनडे सामन्याआधी सराव करताना त्याच्या डोक्याला चेंडूचा जोरदार आघात झाला होता. त्याच्या कन्कशनच्या विविध चाचण्या घेण्यात आल्या असून तो आता खेळण्यास सज्ज झाला आहे. ‘गेल्या दोन दिवसांपासून मी दुबईत असून विश्रांती घेतल्यानंतर धावण्याचा थोडा सराव केला. चाचणीचा एक भाग म्हणून काल झिगझॅग धावणेही केल्यानंतर खेळण्यासाठी मला होकार देण्यात आला,’ असे स्मिथने सांगितले. कर्णधार उपलब्ध असल्याने प्रशिक्षक अँड्रय़ू मॅकडोनाल्ड यांनीही आनंद व्यक्त केला आहे. स्टोक्सचे वडील आजारी असल्याने तो काही काळ उपलब्ध होणार नाही. पण त्याच्या नसण्यामुळे संघाचा समतोल बिघडणार आहे. पहिली आयपीएल स्पर्धा जिंकल्यानंतर या संघाकडून विशेष चमकदार प्रदर्शन झालेले नाही. याशिवाय जोस बटलरही या सामन्यासाठी उपलब्ध असणार नाही. तो कुटुंबियासह दाखल झाला आहे. पण त्याला दुबईत 36 तासांचे सक्तीचे क्वारन्टाईन पूर्ण करावे लागणार आहे.
मागील वर्षीच्या उपविजेत्या चेन्नईने पहिल्याच सामन्यात विजेत्या मुंबई इंडियन्सला हरवून मागील पराभवाची परतफेड केली. त्यामुळे त्यांचे मनोबल उंचावलेलेच असेल. जोफ्रा आर्चरसह डेव्हिड मिलर, अँड्रय़ू टाय, टॉम करन यांची उपस्थिती त्यांच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. रॉयल्स संघातील भारतीय खेळाडूंचे प्रदर्शन ही त्यांची मुख्य समस्या बनली आहे. त्यांच्यात सातत्याचा अभाव दिसून आला आहे. संजू सॅमसन, रॉबिन उथप्पा, जयदेव उनादकट, वरुण ऍरॉन हे अपेक्षापूर्ती करण्यात अपयशी ठरले आहेत.
शारजाहची खेळपट्टी आकार आणि पृष्ठभाग यांच्याबाबतीत गोलंदाजांसाठी वेगळे आव्हान उभे करणारी आहे. त्यावर धावा होत असल्याने मोठी धावसंख्या रचलेली पहावयास मिळण्याची शक्यता आहे. खेळाडूंनी बराच वेळ त्यावर सराव केला असल्याने स्टेडियमची त्यांना आता बऱयापैकी ओळख झाली आहे. मागील सामन्यात सॅम करनने अष्टपैलू चमक दाखविली असल्याने या सामन्यातही ड्वेन ब्रॅव्होची उणीव चेन्नईला भासणार नाही. ब्रॅव्हो जखमी असल्याने पहिल्या सामन्यात खेळू शकला नव्हता. आयपीएलमधील एक यशस्वी गोलंदाज पीयूष चावलाचा समावेश झाल्याने त्यांची बाजू आणखी वरचढ ठरणार आहे. दीपक चहरला किरकोळ दुखापत झाली असून तो उपलब्ध होऊ न शकल्यास शार्दुल ठाकुरला त्याच्या जागी संधी मिळू शकते.
संघ : सीएसके : धोनी (कर्णधार), मुरली विजय, रायुडू, डु प्लेसिस, वॅटसन, केदार जाधव, ब्रॅव्हो, जडेजा, एन्गिडी, दीपक चहर, चावला, इम्रान ताहिर, सँटनर, हॅझलवुड, शार्दुल ठाकुर, सॅम करन, एन.जगदीशन, केएम असिफ, मोनु कुमार, आर. साई किशोर, रुतुराज गायकवाड, कर्ण शर्मा.
राजस्थान रॉयल्स : स्मिथ (कर्णधार), बटलर, उथप्पा, सॅमसन, स्टोक्स, आर्चर, यशस्वी जयस्वाल, मनन व्होरा, कार्तिक त्यागी, आकाश सिंग, ओशेन थॉमस, टाय, मिलर, टॉम करन, अनिरुद्ध जोशी, श्रेयस गोपाळ, रियान पराग, वरुण ऍरोन, शशांक सिंग, अनुक रावत, महिपाल लोमरोर, मयांक मार्कंडे.
सामन्याची वेळ : सायं. 7.30 पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स.