आंध्रप्रदेशात पुरामुळे स्थिती खराब – पुड्डुचेरीत पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा
वृत्तसंस्था/ चेन्नई
पुड्डुचेरी या केंद्रशासित प्रदेशात 29 नोव्हेंबरपर्यंत अतिवृष्टी होऊ शकते असा अनुमान हवामान विभागाने वर्तविला आहे. तर हवामान विभागाने शनिवारी चेन्नई शहरासाठी यलो अलर्ट जारी केला असून तामिळनाडूच्या राजधानीत सोमवारपर्यंत जोरदार पाऊ पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सखल भागांमध्ये राहणाऱया लोकांना सतर्क राहण्याचा इशारा विभागाने दिला आहे.
तामिळनाडूतील रामनाथपुरम, थूथुकुडी, तिरुनेलवेली, पुडुओकोट्टई आणि नागपट्टणम जिल्हे अतिवृष्टीला सामोरे जात असून रस्ते आणि रेल्वेमार्ग पाण्याखाली बुडाले आहेत. अनेक नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. पूरसंकटामुळे शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत. हवामान विभागानुसार सोमवारपर्यंत अतिवृष्टी सुरूच राहणार आहे. परंतु दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या चक्रीवादळीय वाऱयांचे क्षेत्र कमी दाबाच्या पट्टय़ात रुपांतरित होण्याची शक्यता नाही.
आंध्रप्रदेशात संकट
आंध्रप्रदेशच्या कडापा जिल्हय़ात अलिकडेच आलेल्या पूरात वाहून गेलेले 16 जण अद्याप बेपत्ता आहेत. पूरामुळे आतापर्यंत 44 जणांचा मृत्यू झाल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी मृत तसेच बेपत्ता व्यक्तींच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत प्रदान केली आहे. देशातील सर्वात दुष्काळग्रस्त जिल्हय़ांपैकी एक असलेला अनंतपूरमध्येही पूरसंकट निर्माण झाले आहे. तिरुपतीमध्येही प्रचंड प्रमाणात पाऊस पडला आहे.
शेतकऱयांचे नुकसान
दक्षिण भारतात पडत असलेल्या या पावसाने तेथील शेतकऱयांचे प्रचंड नुकसान घडविले आहे. शेतांमध्ये उभे राहिलेले पिक पावसामुळे मातीमोल ठरले आहे. तर हवामान विभागाने दक्षिण भारतात सुरू असलेला अतिवृष्टीचा कहर लवकरच थांबणार असल्याचे संकेत दिले आहेत.