रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचा 9 चेंडू व 7 गडी राखून एकतर्फी विजय
सुकृत मोकाशी / पुणे
चेन्नई सुपरकिंग्सपाठोपाठ मुंबई इंडियन्सला देखील यंदाच्या आयपीएल साखळी फेरीत चौथ्या पराभवाचा झटका सोसावा लागला असून यामुळे त्यांचेही स्पर्धेतील आव्हान धोक्यात आले आहे. शनिवारी येथील गहुंजे स्टेडियमवर झालेल्या साखळी सामन्यात मुंबईला 6 बाद 151 धावांवर रोखल्यानंतर आरसीबीने 18.3 षटकात 3 बाद 152 धावांसह एकतर्फी विजय संपादन केला.
विजयासाठी 152 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार प्लेसिस 16 धावांवर बाद झाला. मात्र, त्यानंतर विराट कोहली व अनूज रावत यांनी दुसऱया गडय़ासाठी 80 धावांची भागीदारी साकारत संघाला विजयाच्या ट्रकवर आणले. अनूज दुसऱया गडय़ाच्या रुपाने बाद झाला, त्यावेळी आरसीबीने 16.5 षटकात 2 बाद 130 अशी भक्कम पायाभरणी केली होती. विराट तिसऱया गडय़ाच्या रुपाने बाद झाला. मात्र, त्यानंतर दिनेश कार्तिक व मॅक्सवेल यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले.
मुंबईच्या धावसंख्येचा पाठलाग करताना आरसीबीचा कर्णधार डय़ू प्लेसिस आणि रावत या सलामवीरांनी संयमी सुरुवात करताना पॉवरप्लेच्या सहा षटकात बिनबाद 30 धावा केल्या होत्या. या दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली असताना डय़ू प्लेसिसला उनाडकतने 16 धावांवर यादवकरवी झेलबाद केले.
दरम्यान, रावतने 38 बॉलमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर आलेल्या विराट कोहली आणि रावतने 80 धावांची भागीदारी करत आरसीबीला विजयासमीप नेले. संघाची धावसंख्या 130 असताना रावत 66 धावांवर रमणदीप सिंगच्या डायरेक्ट थ्रोवर धावबाद केले. रावतने 66 धावांच्या खेळीत दोन चौकार आणि सहा षटकार मारले. विजसाठी 8 धावांची गरज असताना विराटही तंबूत परतला. विराटने पाच चौकारांसह 48 धावा केल्या. त्याला ब्रेव्हिसने पायचित टिपले. यानंतर मॅक्सवेलने दोन चेंडूत 8 धावा काढून आरसीबीला विजय मिळवून दिला. कर्तिक 7 तर मॅक्सवेल 8 धावांवर नाबाद राहिला.
चाहता मैदानात
दरम्यान, तेरावे षटक सुरु असताना विराट कोहली आणि रोहित शर्माचा चाहता मैदानात घुसला. त्याने पहिल्यांदा विराट कोहलीच्या हातात हात दिला. त्यानंतर तो लगेच कव्हरमध्ये फिल्डिंग करत असलेल्या रोहित शर्माच्या जवळ गेला. त्या चाहत्याला लगेचच पोलिसांनी मैदानातून बाहेर काढले.
मुंबईची सावध सुरुवात
प्रारंभी, मुंबई इंडियन्सने सावधपणे सुरुवात करुन पॉवरप्लेच्या सहा षटकात बिनबाद 49 धावा केल्या. त्यानंतर लगेच मुंबईच्या 50 धावा झाल्या असताना रोहित शर्मा 26 धावा काढून बाद झाला. त्यात त्याने चार चौकार आणि एक षटकार मारला. हर्षल पटेलने स्वतःच्याच बॉलिंगवर त्याचा झेल घेतला. 60 धावा झाल्या असताना हसरंगाने ब्रेव्हिसला आठ धावांवर पायचीत टिपले. यानंतर इशान किशनही 26 धावा करून लगेचच तंबूत परतला. त्याला आकाशदीपने सिराजकरवी झेलबाद केले. यानंतर तिलक वर्माही शून्य धावांवर बाद झाला. त्याला मॅक्सवेलने चपळाईने धावबाद केले. त्यामुळे मुंबईची दहाव्या षटकात बिनबाद 50 वरून 4 बाद 62 अशी अवस्था झाली होती. मागच्या मॅचमध्ये 5 चेंडूत 22 धावा करणाऱया कॅरेन पोलार्डला चमक दाखविता आली नाही. तो शून्यावर बाद झाला. त्याला हसरंगाने पायचित करून आपल्या जाळ्यात ओढले. यावेळी मुंबई इंडियन्स 5 बाद 62 धावा झाल्या होत्य्या. धावफलकावर 79 धावा झाल्या असताना हर्षल पटेलने रमणदीप सिंगला दिनेश कार्तिककरवी झेलबाद केले. यानंतर सूर्यकुमार यादव ने सूत्र आपल्या हातात घेतली. त्याने उनाडकत ला हाताशी घेत 7 विकेटकरिता नाबाद 72 धावांची भागीदारी केली. सूर्यकुमार यादवने सलग दुसरे अर्धशतक झळकावून नाबाद 68 धावा केल्या. पाच चौकार आणि सहा षटकारांच्या साह्याने आपली खेळी साजविली. तर उनाडकतने नाबाद 13 धावा केल्या. या भागीदारीमुळे मुंबईला सहा बाद 151 धावापर्यंत मजल मारता आली. बंगळुरूकडून हसरंगा, पटेल ने दोन बळी घेतले. तर, आकाशदीपने एक बळी टिपला.
पुण्यातींल गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर हा सामना रंगला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स ः 20 षटकात 6 बाद 151 (सूर्यकुमार यादव 37 चेंडूत 5 चौकार, 6 षटकारांसह नाबाद 68, रोहित शर्मा 15 चेंडूँत 26, इशान किशन 28 चेंडूत 26. अवांतर 4. वणिंदू हसरंगा 4 षटकात 2-28, हर्षल पटेल 2-23, आकाश दीप 1-20).
आरसीबी ः 18.3 षटकात 3 बाद 152 (अनूज रावत 47 चेंडूत 2 चौकार, 6 षटकारांसह 66, विराट कोहली 36 चेंडूत 48, प्लेसिस 16. उनादकट, ब्रेविस प्रत्येकी 1 बळी).









