आयएसएल फुटबॉल : 2-0 गोल्सनी मात, विजयी संघातर्फे फ्रान सँडाजा, जोएल चियानीसे यांनी नोंदवले एकेक गोल
क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेतील निर्णायक टप्प्यात हैदराबाद एफसीने विजयाची नोंद करताना चेन्नईन एफसीला 2-0 गोलांनी पराभूत केले. रविवारी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यातील निकालाने बाद फेरीतील आणि प्रामुख्याने तिसऱया आणि चौथ्या स्थानासाठी चुरस आता आणखी तीव्र झाली आहे.
वास्कोतील टिळक मैदानावरील या सामन्यात चेन्नईन एफसीला वर्चस्व ठेवूनही गोल करण्यात अपयश आले. त्यांचे तीन वेळा गोल होण्याचे फटके आडव्या पट्टीला आदळून परत आले. हैदराबाद एफसीनी मिळालेल्या संधींचे सोने करताना दोन्ही गोल नोंदविले. त्यांचा आघाडी फळीतील स्पेनचा खेळाडू फ्रान सँडाजाने 28 व्या मिनिटाला खाते उघडले तर सामना संपण्यास सात मिनिटे शिल्लक असताना ऑस्टेलियाचा बदली खेळाडू जोएल चियानीसेने दुसरा गोल करून विजय सोपा केला.
विजयाच्या तीन गुणांनी हैदराबाद एफसीचे आता 15 सामन्यांतून पाच विजय, सात बरोबरी आणि तीन पराभवाने 22 गुण झाले. त्यांनी एफसी गोवा आणि नॉर्थईस्ट युनायटेड एफसीला मागे टाकत पाचव्या स्थानावरून तिसरे स्थान गाठले. प्रत्येकी 21 गुण असलेल्या एफसी गोवा आता चौथ्या तर नॉर्थईस्टचा संघ पाचव्या स्थानावर आहे. या दोन्ही संघांनी हैदराबादपेक्षा एक सामना कमी खेळला आहे. चेन्नईन एफसीला 15 व्या सामन्यांत पाचवा पराभव स्वीकारावा लागला. तीन विजय व सात बरोबरीने 16 गुणांवर ते कायम राहिले.
सामन्याच्या दुसऱयाच मिनिटाला चेन्नईनच्या जॅरी लालरिनझुआलाने मारलेला फटका हैदराबादचा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमणीने अडविला. हैदराबाद एफसीने आपल्या पहिल्या गोलाची नोंद 28 व्या मिनिटाला केली. यावेळी जुवांव व्हिक्टरने दिलेल्या पासवर स्पॅनिश खेळाडू फ्रान सँडाजाने चेन्नईनचा गोलरक्षक विशाल कैथला भेदले व चेंडू जाळीत मारला. त्यापूर्वी चेन्नईनच्या इस्माईल गोन्साल्वीसने लालिरयानझुआला छांगटेने दिलेल्या पासवर गोल करण्याची संधी गमविली होती.
दुसऱया सत्रात चेन्नईनने दिमाखदार खेळ केला आणि हैदराबाद एफसीवर सतत दबाव ठेवला. हैदराबादच्या उजव्या बगलेतून लालियानझुआला छांगटेने काही धोकादायक क्रॉस पासेस दिले, मात्र याचा फायदा घेण्यात चेन्नईनचे स्ट्रायकर्स अयशस्वी ठरले. 47 व्या मिनिटाला चेन्नईन एफसीच्या इली साबिया व 67 व्या मिनिटाला थॉय सिंगच्या स्थानावर खेळण्यासाठी आलेल्या बदली खेळाडू फतखुलो यांचे फटके गोलच्या आडव्या पट्टीला आदळून परत आले. त्यानंतर लालियानझुआला छांगटेने दिलेल्या पासवर प्रथम एडवीन वंसपॉल आणि नंतर रहीम अली यांनी गोल करण्याच्या सोप्या संधी गमविल्या. सामन्याच्या 83 व्या मिनिटाला जुवांव व्हिक्टरने दिलेल्या पासवर जोएल चियानीसेने हैदराबाद एफसीचा दुसरा गोल केला.









