सेहवागची फटकार
‘तुम्ही उत्तम प्रदर्शन करा वा ना करा, पगार मिळणारच, याची त्यांना खात्री आहे’, अशा शब्दात माजी भारतीय सलामीवीर विरेंद्र सेहवागने चेन्नई सुपरकिंग्सच्या फलदांजांचा समाचार घेतला. केकेआरविरुद्ध बुधवारी झालेल्या सामन्यात 168 धावांचा पाठलाग करताना अनुभवी सलामीवीर शेन वॅटसनने सलग दुसरे अर्धशतक झळकावले. पण, उर्वरित फलंदाजांनी बरीच निराशा केली आणि चेन्नईला त्या सामन्यात 5 बाद 157 धावांवर समाधान मानावे लागले. हा त्यांचा 5 सामन्यातील चौथा पराभव ठरला.
‘चेन्नईने तो सामना सहज जिंकायला हवा होता. पण, केदार जाधव व रविंद्र जडेजा यांनी बरेच चेंडू निर्धाव खेळून काढले आणि याचा संघाला फटका बसला. माझ्या मते चेन्नईचे फलंदाज सरकारी नोकरांसारखे वागत आहेत. उत्तम खेळ साकारला किंवा नाही साकारला तर पगार मिळणारच, हे त्यांना माहीत आहे’, असे सेहवाग येथे म्हणाला. चेन्नईची पुढील लढत आज आरसीबीविरुद्ध होत आहे.









