भामटय़ांनी महिलेचे मंगळसूत्र लांबविले
प्रतिनिधी/ बेळगाव
मंडोळी रोडवरील गजानन महाराज मंदिरासमोर चेनस्नॅचिंगची घटना घडली आहे. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली असून मोटारसायकलवरून आलेल्या दोघा भामटय़ांनी महिलेच्या गळय़ातील मंगळसूत्र लांबविले आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
शनिवारी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. एक महिला मंडोळी रोडवरून जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोघा भामटय़ांनी तिच्या गळय़ातील मंगळसूत्राला हात घालून हिसडा मारला. या घटनेत महिलेच्या मानेला जखम झाल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेची माहिती समजताच टिळकवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यासंबंधी टिळकवाडी पोलिसांशी संपर्क साधला असता कोणीही फिर्याद दिली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. उपलब्ध माहितीनुसार ही महिला आगरकर रोड परिसरातील आहे.









