वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय कसोटी संघातील आघाडीचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने सोमवारी आपल्या फलंदाजीच्या सरावाला नेटमध्ये प्रारंभ केला. कोरोना महामारी संकटामुळे तब्बल तीन महिन्यांच्या कालावधीत पुजाराला क्रिकेटचा सराव करता आला नाही.
सोमवारी पुजाराने नेटमध्ये फलंदाजीचा सराव बराच वेळ करताना इको सिस्टीमचा अवलंब केला होता. देशातील सर्व क्रीडा हालचाली कोरोनामुळे मार्चच्या शेवटच्या आठवडय़ापासून स्थगित झाल्या होत्या. पुजाराला आपल्या निवासस्थानी या समस्येमुळे रहावे लागले होते. देशातील लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू असताना काही ठिकाणी कोरोना परिस्थितीत सुधारणा झाल्याने नियमावलीमध्ये शिथिलता करण्यात आली आहे. पुजाराने नेटमध्ये सराव करताना कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे काटेकोर पालन केले आहे. शारीरिक तंदुरूस्ती राखण्यासाठी त्याने व्यायामही सुरू केला आहे. पुजाराने आपल्या इन्स्टाग्रामवर आपल्या छायाचित्रासह ही माहिती प्रसिद्ध केली आहे.









