मागच्या वेळेस शशिकांत शिंदेंनीच चेअरमनपदाला विरोध केला होता : आमदार शिवेंद्रराजेंनी केला पत्रकार परिषदेत गौप्यस्फोट
प्रतिनिधी /सातारा
मीच जिल्हा बँकेचा चेअरमन असावे. मलाच ती खुर्ची मिळावी. चेअरमनपदाच्या खुर्चीचा चिटकून बसायचा माझा काही अट्टहास नव्हता. सगळय़ांनी इच्छा व्यक्त केली तशी मीही चेअरमनपदासाठी इच्छा व्यक्त केली होती. परंतु मागच्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीवेळी पॅनेलची बैठक झाली. त्यावेळी शशिकांत शिंदे साहेबांनीच मला चेअरमन होण्यासाठी विरोध केला होता, असा गौप्यस्फोट आमदार शिवेंद्रराजेंनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, लोकांची सहानभूती मिळवण्यासाठी शशिकांत शिंदेचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे, अशीही टीप्पणी त्यांनी केली.
सुरुची बंगल्यावर सायंकाळी उशिरा आमदार शिवेंद्रराजे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, शशिकांत शिंदे म्हणताहेत की माझ्याच शिफारशीमुळे शिवेंद्रराजे हे जिल्हा बॅंकेचे चेअरमन झाले होते. तसेच आता माझी शिफारस नसल्याने ते चेअरमन झाले नाहीत. हे त्यांचे वक्तव्य म्हणजेच शिंदेसाहेबांकडून खोटी सहानभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे. किती खालच्या पातळीवर जायचे आणि बोलायचे याचा त्यांनी विचार करावा. जिल्हा बँकेच्या मागील निवडणुकीनंतर राष्ट्रवादी कार्यालयात पॅनेल प्रमुखांची बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये चेअरमन कोणाला करायचे ही चर्चा सुरु असताना मला चेअरमनपद द्यावे असा निर्णय झाला. त्यावेळी मी त्या बैठकीत स्पष्टपणे भूमिका मांडली की एका, दुसऱया वर्षासाठी मला चेअरमनपद नको. देणार असाल तर पाच वर्षासाठी अख्खी टर्म द्या, अशी मी भूमिका मांडली होती. मला आजही आठवते की त्यावेळी शशिकांत शिंदे यांनीच त्यावर आक्षेप घेतला होता. पाच वर्षासाठी तुम्ही चेअरमन नकोत पुढे आपल्याला वेगळे काही करता आले तर अशी भूमिका त्यांनी मांडली होती. त्यांनी माझ्यासाठी चेअरमनपदाला शिफारस करण्याचा प्रश्नच येत नाही. आता निवडून आले नाहीत म्हणून काहीही वक्तव्य करत आहेत. मला चेअरमनपदाची सहा वर्ष मिळाली. कोरोनामुळे एक वर्ष मुदतवाढ मिळाली. यावर्षात बँक चांगली चालवता आली. एक वेगळय़ा उंचीवर बँक नेता आली. मला काय चेअरमनपदाला चिटकून राहयच नव्हते. मीच जिल्हा बँकेचा चेअरमन असावा. मीच तेथे हवा. ही माझी भूमिका किंवा अट्टाहास नव्हता, असाही टोला त्यांनी आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर लगावला.









