ऑनलाईन टीम / मुंबई :
शनिवारी रात्री मुंबईसह उपनगरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे चेंबूरमध्ये एका ठिकाणी दरड कोसळून तर दुसऱ्या ठिकाणी डोंगराच्या कडेला बांधलेली बीएआरसीची भिंत कोसळल्याने 17 जणांचा मृत्यू झाला आहे. विक्रोळी भागातही एक इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चेंबूरच्या आरसीएफ परिसरातील भारत नगरमध्ये मध्यरात्री एकच्या सुमारास डोंगराच्या कडेला असलेली संरक्षक भिंत पाच घरावर पडली. तर दुसऱ्या घटनेत घरांवर दरड कोसळली. साधारण 50 मीटर अंतरावर या दोन्ही घटना घडल्या. या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 6 जणांना वाचविण्यात बचाव पथकांना यश आले आहे. दोन घरातील मलबा बाहेर काढण्यात आला असून, इतर घरातील मलबा बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.








