अपघाताचा धोका, वाहनचालकांची गैरसोय : रस्ता दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
कॅन्टोन्मेंट परिसरातील बहुतांश रस्त्यांची वाताहात झाली असून वाहने चालविणे मुश्किल बनले आहे. युनियन जिमखानापासून कॅम्प रहदारी पोलीस स्थानकाकडे जाणाऱया चॅपेल रोडवर खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले असून, वाहनधारकांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
कॅन्टोन्मेंट परिसरातील अनेक रस्ते वाहतुकीस खुले करण्यात आले आहेत. तसेच शहरात वाहनांची संख्या वाढल्याने रहदारीचे प्रमाणही वाढले आहे. परिणामी शहरातील रस्त्यांची दुरवस्था होत आहे. विशेषतः कॅन्टोन्मेंट परिसरातील सर्रास रस्ते खराब झाले असून, ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले आहेत. स्वतंत्रता मार्ग आणि टिळकवाडीकडे जाणाऱया मिलिटरी महादेव रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.
रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी कॅन्टोन्मेंटकडे केली असता निधी नसल्याचे सांगण्यात येते. सदर रस्त्याचा वापर शहरातील सर्वच वाहनधारक करीत असल्याने रस्त्याच्या विकासासाठी जिल्हा प्रशासनाने निधी मंजूर करावा अशी मागणी करण्यात आली होती. पण जिल्हा प्रशासनाने कॅन्टोन्मेंट बोर्डच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सदर रस्त्याच्या विकासाकडे कानाडोळा झाला आहे.
युनियन जिमखान्याकडून कॅम्प परिसरात येणाऱया चॅपेल रोडवर ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले असून, या खड्डय़ातून मार्ग काढताना नागरिक व वाहनधारकांची गैरसोय होत आहे. शहरातील अनेक वाहनधारक या रस्त्याचा वापर करतात. पण चॅपेलरोडवर नाल्याच्या पुलाशेजारी रस्ता पूर्णपणे उखडून गेला आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरूस्ती करावी अशी मागणी होत आहे.









