कहर, तांडव हे शब्द अपुरे ठरावेत असे कोरोना या विषाणूने जगभर थैमान घातले आहे. ऑक्सफर्डची लस नोव्हेंबरपर्यंत येईल आणि मोकळा श्वास घेता येईल या आशेला शुक्रवारी अचानक धक्का बसला आणि अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. पण यातून आता मार्ग निघाला व ऑक्सफर्डच्या लसीची चाचणी पुन्हा सुरू झाली आहे. त्याचबरोरबर कोवॅक्सिनचे माकडावरचे प्रयोग यशस्वी व प्रभावी ठरल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे अंधार दाटतो आहे असे वाटत असतानाच पुन्हा प्रकाशाचा कवडसा दिसावा आणि आशा जागाव्यात अशी सर्वसामान्य माणसांची अवस्था झाली आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद मोदींनी लस येईपर्यंत निष्काळजीपणा नको असा इशारा देऊन लस आणि लसीकरण या संदर्भातील आणि प्रादुर्भाव टाळण्यासाठी शिस्त व काळजी किती गरजेची आहे हे अधोरेखित केले. खरेतर कोरोनामुळे अवघे विश्व संकटात आहे. कोरोनाच्या या संकटात सर्वांनी जबाबदारीने आणि सार्वहित लक्षात घेऊन आपली भूमिका पार पाडली पाहिजे. आपण सार्वजनिक आरोग्य सुविधा व व्यवस्थेकडे किती दुर्लक्ष केले याचे भान आणि भोग या निमिताने दिसत आहेत. सरकारी यंत्रणा या संकटावर मात करायला कुचकामी ठरत आहे. जोडीला खाजगी यंत्रणेतही पाशवी व पिपासू वृत्ती बळावत असल्याचे दिसते आहे. खाजगी दवाखान्यात सरासरी दोन लाख रू. कोरोना उपचारासाठी मोजावे लागतात. ज्या घरात हे संकट आले तेथे ते एका पेशंटवर थांबत नाही. घरात दोन चार पॉझिटिव्ह झाले तर आयुष्यभराची पुंजी संपून अशा कुटुंबीयांना कर्जबाजारी होण्याची, रस्त्यावर येण्याची वेळ येते. कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱया गेल्या, अनेकांना स्थलांतर करावे लागले, अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. उद्योग, व्यापार बंद पडला. ज्यांच्या घरात ही महामारी घुसली त्यांचे हाल तर न विचारलेलेच बरे. पण इतके होऊनही या महामारीबद्दल अपेक्षित जागरूकता, सर्तकता शेवटच्या माणसापर्यंत पोहोचली असे दिसत नाही आणि जी संवेदनशिलता, मानवता, सर्वाठायी असायला हवी ती जाणवत नाही. म्हणूनच या संकटातही काही प्रवृत्ती पिपासू झाल्याचे जाणवते आहे. ज्या बातम्या येत आहेत त्यात ‘बेड देता का बेड’ अशी आर्त हाक ऐकू येते आहे. जोडीला नका मला दाखवू तपासले की पॉझिटिव्ह येणार. दोन तीन लाख खर्च होणार, तुमच्या अंगावर कर्ज करून मरण्यापेक्षा तसाच मरतो, थकलोय, असे हतबल उद्गारही ऐकू येत आहेत. आज अनेक मंडळी तपासणीशिवाय घरातच कोरोना अंगावर काढत आहेत. महासत्ता बनू म्हणणाऱया तुम्हा-आम्हा सर्वांना हे शोभादायक नाही. अनेक ठिकाणी बेड नाहीत, डॉक्टर नाहीत, नर्स, वॉर्ड बॉय नाहीत. ऑक्सिजन मिळत नाही, औषधे व उपचार परवडत नाही अशी अवस्था आहे. पन्नास खाटांचे सुसज्ज हॉस्पिटल उभारले तर महिन्यात किमान तीन कोटीची कमाई होते असे हळू आवाजात बोलले जाते आहे. एकूणच अर्थव्यवस्था आणि माणुसकी व्हेंटिलेटरवर आहे अशी स्थिती आहे. एकीकडे ही अवस्था तर दुसरीकडे लोकांना अजूनही कोरोना लढाईचे भान दिसत नाही. लोक मास्क वापरत नाहीत. स्वच्छता पाळत नाहीत. सोशल डिस्टन्स सांभाळत नाहीत. चमकोगिरी, राजकारण, खाबुगिरी थांबत नाही. नागपुरात मुंढेंना निरोप देण्यासाठी झालेली गर्दी असो अथवा शहरात बाजारपेठेत उसळत असलेला उत्साह असो हे भान नसल्याचे निदर्शक आहे. सर्व गोष्टी कायद्याने व दांडक्याने होत नसतात. प्रत्येकाची व्यक्तिगत काही जबाबदारी, कर्तव्य असते. अशावेळी राज्यकर्ते, नेते यांची विशेष जबाबदारी असते. पण या सर्व बाबतीत उजेडच आहे. त्यामुळे कुणाला नाव ठेवायचे आणि कोण चूक-बरोबर यापेक्षा आम्ही सर्वजण या संकटाचे भान विसरलो आहोत असेच म्हटले पाहिजे. सुदैवाने ब्रिटनमध्ये आरोग्य नियंत्रकांनी साईड इफेक्ट झालेल्या स्वयंसेवकाची फेरतपासणी करून ऑक्सफर्डच्या लसीच्या पुन्हा चाचण्या सुरू करण्यास परवानगी दिली आहे. भारत बायोटेक या हैदाबादमधील बायोटेक कंपनीच्या कोरोनावरील पहिल्या टप्प्यातील चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. त्यांनी माकडावर लसीची चाचणी केली. या लसीनंतर मकाका जातीच्या माकडात रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. आता भारत बायोटेकला पुढील संशोधनाला परवानगी मिळाली आहे. जगभर शास्त्रज्ञ या महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी संशोधन करत आहेत. रात्रीचा दिवस करून त्यांचे काम सुरू आहे पण ही लस येईपर्यंत आणि ती सिद्ध होऊन कोरोनावर विजय मिळवेपर्यंत तुम्हा-आम्हा सर्वांना भान ठेवले पाहिजे आणि लस येईपर्यंत कोणताही निष्काळजीपणा उपयोगाचा नाही. अशावेळी संयम महत्त्वाचा आहे. घाबरून चालणार नाही. सुदैवाने आपल्या देशात कोरोना रिकव्हरीचा रेट चांगला म्हणजे 77 टक्क्याहून अधिक आहे. आजपर्यंत या महामारीची बाधा झालेले 36 लाखाहून अधिक या आजारावर मात करण्यात यशस्वी झाले आहेत. तथापि, कोरोनाचा विळखा आणि विखारी नखे माणसांच्या नरडीचा घोट घेताना दिसत आहेत. पंतप्रधानांनी म्हटल्याप्रमाणे या अशावेळी काडीचाही निष्काळजीपणा नको आणि सरकारी नियम, आरोग्य सवयी पाळून, संयमाने, धैर्याने व एकजुटीने संकटावर मात केली पाहिजे. राजकारण, व्यवसाय, स्वार्थ, स्पर्धा हे आहेच. पण या संकटात, मानवतेचे, माणुसकीचे आणि संयमाचे, शहाणपणाचे दर्शन व्हावे. खाजगी रूग्णालये, डॉक्टर आणि कंपन्या यांनीही या संकटात संयमाची आणि सेवाभावाची भावना ठेवावी, कुणाही रूग्णाकडे पैसे नाहीत आणि चांगला उपचार मिळाला नाही म्हणून त्याचे मरण ओढवणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. रोजचा दिवस कालचा दिवस बरा होता असा येतो आहे. काळजाचा ठोका चुकतो आहे. पण यावर मात करण्याची इच्छाशक्ती आणि कृती केली पाहिजे.
Previous Articleनागजंपीनं तोडलं
Next Article तासगावात एकाच दिवशी 36 रुग्ण कोरोनाबाधित
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








