प्रतिनिधी/ बेंगळूर
कोरोना संसर्गाविषयी अनेक डॉक्टर आपापली मते मांडताना आढळून येत आहेत. त्यामुळे जनतेमध्ये गोंधळ आणि भीती निर्माण होत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने डॉक्टर आणि तज्ञांना कोरोनाविषयी चुकीची आणि अपूर्ण माहिती देऊ नये, असा इशारा दिला आहे. मंगळवारी यासंबंधीचे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
राज्यात कोरोनाविषयी विविध माध्यमाद्वारे काही डॉक्टर, वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती आणि तज्ञ जनतेला अर्धवट आणि चुकीची माहिती देत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे, असे आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या आयुक्तांनी पत्रकात म्हटले आहे. चुकीची माहिती जनतेपर्यंत पोहोचल्यास त्यांच्यामध्ये विनाकारण गोंधळ, भीती निर्माण होऊ शकते. तसेच ते आरोग्य आणि महसूल खात्याने जारी केलेल्या मार्गसूचींचे पालन करणे टाळू शकतात. त्यामुळे सर्वांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कोरोना संसर्गाविषयी अर्धवट किंवा चुकीची माहिती देऊ नये. अन्यथा संबंधीतांवर कारवाई करावी लागेल, असा इशारा सरकारने डॉक्टरांना दिला आहे.
कोरोनाविषयी जनतेला माहिती देताना त्यांना अधिकाधिक सुरक्षा उपाययोजनांविषयी माहिती द्यावी. जनतेला आरोग्याबाबत काळजी घेण्यासंबंधी सल्ले द्यावेत. आरोग्य मंत्रालय, भारत सरकार, कर्नाटक सरकारने जारी केलेल्या मार्गसूचीचे आधी वाचन करा त्यानंतरच सार्वजनिक आरोग्याबाबत पुरेसा अनुभव असणाऱयगा डॉक्टरांनी, तज्ञांनी प्रसारमाध्यमांसमोर किंवा कोणत्याही व्यासपीठावर विधाने वा सल्ले द्यावेत. जर चुकीचे सल्ले तसेच गैरसमज पसरविल्यास संबंधीत डॉक्टरांवर कारवाई करण्यात येईल. आपत्ती नियंत्रण कायदा 2005 च्या नियम 54 आणि कर्नाटक संसर्गजन्य रोग नियंत्रण कायदा 2020 च्या नियम 4 (क) अंतर्गत संबंधीतांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आरोग्य खात्याने पत्रकाद्वारे दिला आहे.
राज्यात कोरोनाच नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, कोरोनाची लक्षणे नसणारे किंवा सौम्य लक्षणे असणाऱया रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे अशा रुग्णांना सरकारने होम आयसोलेश करण्याचा सल्ला सरकारने मार्गसूचीद्वारे दिला आहे. तसेच तीव्र लक्षणे असणाऱया किंवा आवश्यकता असलेल्या कोरोना रुग्णांनाच इस्पितळात दाखल करून घ्यावे, अशी सूचना सरकारने केली असून त्याकरिता दरही निश्चित केला आहे. त्यानुसारच रुग्णाकडून उपचाराचे बिल घ्यावे. अधिक वसुली करू नये, असा आदेश इस्पितळांना दिला होता. आता कोरोनाच्या तिसऱया लाटेदरम्यान अनेक डॉक्टर आपापली मते व्यक्त करताना दिसून येत आहेत. मात्र, काही जणांकडून अर्धवट किंवा चुकीची माहिती देण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्याने मंगळवारी आरोग्य खात्याच्या आयुक्तांमार्फत पत्रक जारी करण्यात आले आहे.









