नवी दिल्ली महापालिकेने फलक हटविले : चीनचा जळफळाट
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नवी दिल्ली येथील चिनी दूतावासानजीक शनिवारी तैवानला राष्ट्रीय दिनानिमित्त शुभेच्छा देणारे फलक झळकले आहेत. परंतु काही तासांमध्येच नवी दिल्ली महापालिकेने हे फलक हटविले आहेत. 10 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय दिनानिमित्त तैवानला शुभेच्छा असे फलकावर नमूद होते. या फलकामुळे चीनच्या जळफळाटात भर पडल्याचे मानले जात आहे.
भाजप नेते तेजिंदर पाल सिंग बग्गा यांच्याकडून चीनला डिवचण्यासाठी हे फलक लावण्यात आले होते. त्यांनी स्वतःच याचे छायाचित्र ट्विटरवर प्रसारित केले आहे. चिनी दूतावास दिल्लीच्या चाणक्यपुरी भागात आहे. तत्पूर्वी चीनच्या दूतावासाने भारतीय प्रसारमाध्यमांना तैवानच्या राष्ट्रीय दिनावेळी भारताच्या ‘एक चीन धोरणा’चे उल्लंघन करू नये असे सांगितले होते.
चीनशी राजनयिक संबंध असणाऱया सर्व देशांनी एक चीन धोरणाचा आदर करावा. दीर्घकाळापासून भारत सरकारचीही हीच अधिकृत भूमिका असल्याचे दूतावासाने पत्र प्रसारित करत म्हटले आहे. भारतीय प्रसारमाध्यमे तैवानच्या मुद्दय़ावर भारत सरकारच्या भूमिकेसोबत राहतील अशी अपेक्षा करत असल्याचेही चीनने नमूद केले आहे.
तैवान सरकारकडून 10 ऑक्टोबर रोजीच्या राष्ट्रीय दिवसापूर्वी भारताच्या अनेक प्रमुख वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देण्यात आल्याच्या पार्श्वभीवर हे पत्र प्रसारित करण्यात आले आहे. चीनकडून प्रसिद्ध दिशानिर्देशावर भारतातील प्रसारमाध्यमे स्वतंत्र असल्याची प्रतिक्रिया केंद्र सरकारने दिली आहे.
तैवानचे लोक भारतीयांची भावना, निडरपणा आणि जे योग्य आहे त्याच्यासाठी उभे राहण्याच्या संकल्पाला विशेष पसंत करतात, असे उद्गार तैवानमधील खासदार वांग टिंग-यू यांनी काढले आहेत. भारतात चिनी दूतावासाने भारतीय प्रसारमाध्यमांना कार्यक्रमापासून दूर राहण्यास सांगितले होते. तेव्हाही तैवानने चीनला चोख प्रत्युत्तर दिले हेते.
भारतीयांचे मानले आभार
समाजमाध्यमांवर भारतातून मिळत असलेल्या प्रचंड समर्थनामुळे तैवानचे विदेश मंत्रालय अत्यंत आनंदी दिसून आले आहे. भारतातून अनेक मित्र तैवान राष्ट्रीय दिनाच्या जल्लोषात सामील होण्यास तयार आहेत. या अद्भूत समर्थनामुळे तैवानमध्ये आनंद व्यक्त होत असल्याचे विदेश मंत्रालयाने ट्विट करत म्हटले आहे.