सीबीआयकडून कार्ती चिदंबरम यांच्या 9 स्थानी धाडी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
माजी अर्थमंत्री आणि काँगेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती यांच्यावर सीबीआयने चीन व्यक्तींकडून 50 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप ठेवला आहे. ही लाच त्यांनी या चीनी व्यक्तींना भारताचा व्हीसा मिळवून देण्यासाठी घेतली असे सीबीआयचे म्हणणे आहे. याच प्रकरणात मंगळवारी कार्ती चिदंबरम यांच्या 9 स्थानांवर धाडी घालण्यात आल्या आहेत.
चिदंबरम यांच्याशी संबंधित आयएसएक्स मिडिया प्रकरणाची चौकशी करत असताना सीबीआयला या लाच प्रकरणाचा सुगावा लागला होता. पंजाबमध्ये तलवंडी साहेब वीज निर्मिती केंद्राचे बांधकाम होत असताना 250 चीनी मजूरांना व्हिसा मिळवून देण्यासाठी ही रक्कम लाच म्हणून देण्यात आली, असा आरोप ठेवण्यात आला आहे. हे प्रकरण 2010 ते 2014 या काळातील आहे. त्यावेळी देशात मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वा संपुआ सरकारचे राज्य होते.
सीबीआयने तामिळनाडूमध्ये तीन, मुंबईत तीन, पंजाबमध्ये एक, कर्नाटकत एक आणि ओडीशात एक अशा 9 ठिकाणी धाडी घातल्या. कार्ती चिदंबरम यांचे घर, तसेच कार्यालयांची झडती या धाडसत्रात घेण्यात आली. चिदंबरम यांच्या दिल्लीतील घराचे गेट बंद असल्याने ते तोडून सीबीआयचे दल आत घुसले.
मनी लाँडरिंगशी संबंधित
हे प्रकरण मनी लाँडिरिंगशी संबंधित आहे. तसेच याचा संबंध आयएनएक्स मिडीया प्रकरणाशीही आहे. आयएनएक्स प्रकरणात इंद्राणी मुखर्जी आणि तिचे पती पीटर मुखर्जी हे आरोपी आहेत. पी. चिदंबरम हे त्यावेळी देशाचे अर्थमंत्री होते. चिदंबरम हे एअरसेल मॅक्सिस प्रकरणातही आरोपी आहेत. आयएनएक्स मिडिया या कंपनीला विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची मान्यता मिळवून देण्यासाठी कार्ती यांच्याशी 10 लाख डॉलर्सचा (सध्याचे 7.7 कोटी रुपये) व्यवहार करण्यात आला होता, असा जबाब इंद्राणी मुखर्जी यांनी दिला होता.
चिदंबरम यांच्याकडून इन्कार
सीबीआयला धाडीत महत्वाची कागदपत्रे सापडल्याचे वृत्त पी. चिदंबरम यांनी फेटाळले आहे. या धाडी राजकीय दृष्टीकोन ठेवून घालण्यात आल्या आहेत. तसेच वेळ साधून घालण्यात आल्या आहेत, असा आरोप त्यांनी केला. तर अशा धाडी इतक्यांदा घालण्यात आल्या आहेत, की, आपण ते विसरुन गेलो आहोत, असे ट्विट कार्ती चिदंबरम यांच्याकडून करण्यात आले आहे.









