ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
सध्या भारत व चीनमध्ये तणावाची परिस्थिती असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिल्ली पोलिसांनी एका मुक्त पत्रकारास चीनसाठी हेरगिरी करण्यावरून अटक केली आहे. या पत्रकाराचे नाव राजीव शर्मा असून या पत्रकाराबरोबरच एक महिला आणि एका पुरूषास देखील पोलिसांनी अटक केली आहे. यातील ही महिला चीनची तर दुसरा पुरुष नेपाळचा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजीव शर्मा यांच्या घरातून पोलिसांनी देशाच्या सुरक्षेशी निगडीत अनेक गोपनीय कागदपत्र हस्तगत केली आहेत. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने राजीव शर्मा यांना अधिकृत गोपनीयता कायद्यांतर्गत अटक करून, पुढील तपास सुरू केला आहे. सध्या न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची कोठडी सुनावली आहे.
याबाबत बोलताना दिल्ली पोलीस म्हणाले, पत्रकार राजीव शर्मा यांनी चिनी गुप्तचर संस्थांना देशाच्या सुरक्षेशी निगडीत संवेदनशील माहिती दिली आहे. या प्रकरणात त्या चिनी महिलेने आणि तिच्या नेपाळी सहकाऱ्यास देखील कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणावर पैसा पुरवल्याप्रकरणी अटक केली असून, त्यांची देखील चौकशी सुरू आहे.