चीनमध्ये खळबळ
नवी दिल्ली :
सीमेवर दीर्घकाळापासून चीनच्या हालचाली सुरु आहेत. परंतु भारतानेही जशास तसे प्रत्युत्तर देण्यास प्रारंभ केल्याने चीन बिथरला असून त्याने सैन्याची जमवाजमव सुरू केली आहे. भारताच्या एक हेरगिरी उपग्रहाने अलिकडेच चीनव्याप्त तिबेटवरून मार्गक्रमण केले आहे. या उपग्रहाने अत्यंत उपयुक्त माहिती जमविल्याने चिनी गोटात खळबळ उडाली आहे. डीआरडीओचा इमिसॅट हा उपग्रह इंटेलिजेन्स इनपूट जमविण्याचे काम करतो. या उपग्रहात ईएलआयएनटी म्हणजेच इलेक्ट्रॉनिक इंटेलिजेन्स सिस्टीम ‘कौटिल्य’ बसविण्यात आली आहे. या यंत्रणेच्या मदतीने संरक्षण क्षेत्राची महत्त्वपूर्ण माहिती प्राप्त करता येते. हा उपग्रह अलिकडेच अरुणाचल प्रदेशनजीकच्या तिबेटी क्षेत्रातून गेल्याचे सांगण्यात आले.
रेडिओ सिग्नलची उकल
इस्रोने निर्माण केलेल्या इमिसॅटची ईएलआयएनटी यंत्रणा शत्रूच्या क्षेत्रात दूरसंचारासाठी वापरल्या जाणाऱया रेडिओ सिग्नल्सची उकल करते. लडाखमध्ये पँगोंग त्सोच्या फिंगर 4 वरून भारत-चीनची झालेली चर्चा निष्फळ ठरल्याच्या दुसऱयाच दिवशी या उपग्रहाने मार्गक्रमण केल्याने चीनमध्ये खळबळ उडाली आहे.
पाकवरही नजर
इमिसॅटच्या ईएलआयएनटीने यापूर्वी पाकिस्तानच्या ओर्मारा येथील नौदल तळावरून घिरटय़ा घातल्या होत्या. चीनच्या मदतीने पाकने येथे पाणबुडय़ा तैनात केल्याचे मानले जाते.









