ऑनलाईन टीम / बीजिंग :
भारत-चीन तणावानंतर जगभरातील 27 देशांनी चीनविरोधात संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगाकडे तक्रार याचिका दाखल केली आहे.
चीनची सीमारेषेवरील दादागिरी, मनमानी पद्धतीने नजरबंदी, व्यापक टेहाळणी, उईगरांविरोधात अत्याचार आणि आयात-निर्यातीवरील निर्बंध या मुद्यांवरून 27 देश एकत्र आले आहेत. त्यांनी चीनविरोधात तक्रार याचिका दाखल केली आहे. या याचिकेत चीनने संमत केलेल्या हाँगकाँग सुरक्षा कायद्याचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. तसेच झिजियांग आणि हाँगकाँगपर्यंत पोहोचण्यासाठी चीनकडून परवानगी मिळवून देण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
चीनविरोधात एकत्र येऊन याचिका दाखल केलेल्या देशांमध्ये कॅनडा, डेन्मार्क, इस्टोनिया, फिनलँड, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, बेल्जियम, बेलीज, आइसलँड, मार्शल आइसलँड्स, नेदरलँड, न्यूझीलंड, नॉर्वे, पलाऊ, युनायटेड किंग्डम, स्लोव्हाकिया, स्लोव्हेनिया, स्वीडन, स्वीत्झर्लंड, जर्मनी, जपान, लाटव्हिया, लिखुआनिया, लक्झेम्बर्ग आणि लिकटेंस्टिन या देशांचा समावेश आहे.









