वृत्तसंस्था / लंडन
हाँगकाँगवरून सुरू असलेल्या तणावादरम्यान अमेरिकेनंतर आता ब्रिटननेही हुवेई या चिनी कंपनीवर बंदी घातली आहे. 2027 पर्यंत 5जी नेटवर्कमधून हुवेईची सर्व उपकरणे हटविली जावीत असा आदेश ब्रिटनच्या सरकारने दूरसंचार कंपन्यांना दिला आहे. यापूर्वी अमेरिकेनेही हुवावेच्या सर्व उपकरणांवर बंदी घातली होती.
पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या बैठकीनंतर देशात 5जी नेटवर्कच्या निर्मितीत चिनी कंपनीची भागीदारी संपुष्टात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ब्रिटनच्या सरकारने नॅशनल सायबर सिक्युरिटी कौन्सिलच्या अहवालाची समीक्षा केल्यावर हे पाऊल उचलले आहे. हुवेई या चिनी कंपनीवर विदाचोरी आणि गोपनीय माहिती उघड केल्याचा आरोप आहे.
राष्ट्रसुरक्षेसाठी हुवावे धोकादायक
अमेरिकेच्या निर्बंधानंतर 5जी नेटवर्कमध्ये हुवेईचे अस्तित्व देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरु शकते. हुवावे स्वतःच्या उपकरणांच्या सुरक्षेसंबंधी कुठलीही हमी देण्याची शक्यता नसल्याचा इशारा ब्रिटनच्या नॅशनल सिक्युटिरी कौन्सिलने दिला होता.
चीनचा दबाव झुगारला
चीन एचएसबीसी बँकेद्वारे ब्रिटनवर प्रकल्पांसाठी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप अमेरिकेचे विदेशमंत्री माइक पॉम्पियो यांनी जून महिन्यात केला होता. चीनने ब्रिटनच्या एचएसबीसीवर मोठा दंड ठोठावण्याची धमकी दिली आहे. ब्रिटनने हुवेईला 5जी नेटवर्कच्या निर्मिती प्रक्रियेत सामील न केल्यास आण्विक ऊर्जा प्रकल्पांसंबंधीचे आश्वासन पाळणार नसल्याचे चीनने म्हटले होते.
हेरगिरीचा प्रकार
शेनझेन येथे मुख्यालय असलेली हुवेई कंपनी प्रत्यक्षात चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या हेरगिरी प्रणालीचा भाग आहे. चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या धमक्यांविरोधात अमेरिका स्वतःच्या भागीदारांसोबत ठाम उभा असल्याचे उद्गार अमेरिकेचे विदेशमंत्री माईक पॉम्पियो यांनी काढले आहेत.
अमेरिकेची बंदी
चिनी दूरसंचार कंपनी हुवेईवर 30 जून रोजी अमेरिकेने बंदी घातली होती. युएस फेडरल कम्युनिकेशन कमिशनने 5-0 अशा मतदानाद्वारे चिनी कंपनी हुवेई आणि झेडटीईला देशासाठी धोकादायक जाहीर केले हेते. याचबरोबर अमेरिकन कंपन्यांना उपकरणांच्या खरेदीकरता मिळणारा 8.3 अब्ज डॉलर्सचा निधी ट्रम्प प्रशासनाने रोखला होता.
चिनी कंपन्यांना दणका
दूरसंचार कंपन्यांना स्वतःच्या प्रणालीत समाविष्ट दोन्ही चिनी कंपन्यांची उपकरणे हटवावी लागणार आहेत. चिनी कम्युनिस्ट पक्षाला अमेरिकेच्या सुरक्षेला धक्का पोहोचवू देणार नसल्याचे उद्गार युएस फेडरल कम्युनिकेशन कमिशनचे अध्यक्ष अजित पै यांनी काढले आहेत.









