43 टक्के भारतीयांचा चीनी वस्तूंवर बहिष्कार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
चीनने मुजोरी करून गलवान येथे भारतीय सैनिकांवर केलेल्या हल्ल्याचा सूड सर्वसामान्य भारतीयांनीही त्यांच्या परीने घेतला आहे. चीनी वस्तूंवर 43 टक्के भारतीयांनी बहिष्कार टाकल्याचे निरीक्षण समोर आले आहे. गलवान येथे भारतीय सैनिकांनी चीनला चोख प्रत्युत्तर देत त्याचे 45 सैनिक मारले होतेच, आता भारतीयांनी चीनला आर्थिक ‘जखमा’ करून जेरीला आणण्याचा प्रयत्न केला.
चीनला धडा शिकविण्यासाठी सर्वसामान्य भारतीय पुढे सरसावले आहेत. चीनी वस्तूंवर बंदी घाला अशी मागणी वर्षापूर्वी करण्यात आली होती. तिला अनुसरून भारत सरकारने टिकटॉकसह सर्व चीनी ऍप्सवर बंदी घातली होती. याचा परिणाम म्हणून गेल्या वर्षभरात 43 टक्के भारतीयांनी एकही चीनी वस्तू खरेदी पेलेली नाही, असे एका सर्वेक्षणातून दिसून आले आहेत. याशिवाय 14 टक्के नागरीकांनी वर्षभरात केवळ 2 ते 5 चीनी वस्तू खरेदी केल्याचे स्पष्ट केले होते. 7 टक्के भारतीयांनी एक वर्षात 5 ते 10 चीनी वस्तू खरेदी केल्या आहेत.
आधी चौकशी केली जाते
गेल्या नोव्हेंबरात केलेल्या सर्वेक्षणात चीनी वस्तूंवर बहिष्कार घातलेल्यांची संख्या 71 टक्के होती. आता ती 43 टक्क्यांवर आली असली तरी अनेकांनी चीनी वस्तू घेण्याचे हेतुपुरस्सर टाळल्याचे दिसून येत आहे. आता लोक वस्तू खरेदी करण्यापूर्वी ती चीनी आहे किंवा नाही याची चौकशी करतात असा अनुभव अनेक व्यापाऱयांनाही आला आहे. अनेक व्यापाऱयांनी चीनी वस्तूंच्या भारतीय पर्यायांच्या विक्रीवर भर दिला आहे, असेही दिसून आले आहे.
व्याप्ती वाढणे आवश्यक
चीनी वस्तूंना नकार देणाऱया भारतीयांची संख्या आणखी वाढणे आवश्यक आहे. आजही अनेकजण केवळ स्वस्त म्हणून चीनी वस्तू खरेदी करतात. या वस्तू स्वस्त असल्या तरी टिकावू नसतात, त्यामुळे हिशेब तोच पडतो. हे भारतीयांनी समजून घेऊन चीनी वस्तूंना भारतीय पर्याय उपलब्ध असेल तर तो आवर्जून (पैशाचा विचार न करता) स्वीकारला पाहिजे असे अनेक तज्ञांचे मत आहे.








