चिनी ऍप्सवर बंदी घालून ड्रगनला आपण जेरीला आणू अशा नादात भारतात कोणी असेल तर तो भंपकपणा होय दुसरे तिसरे काही नाही असे आंतरराष्ट्रीय राजकारणातील जाणकार सांगत आहेत.
चीनला भारत केव्हा, कधी, कसा जबाब देणार हा आज कळीचा मुद्दा बनला आहे. कारण चिनी ड्रगनने सीमेवर ज्या प्रकारे घुसखोरी सुरू केली आहे आणि दादागिरी चालवली आहे त्याला भारताने वेळीच सडेतोड उत्तर दिले नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल अशी भीती तज्ञमंडळी व्यक्त करत आहेत. ‘दादा’ ‘बाबा’ करत चीनला चुचकारण्याने काहीही साध्य होणार नाही असे त्यांचे मत आहे. म्हणूनच गेल्या आठवडय़ात रशियाच्या अनौपचारिक मध्यस्थीने भारत आणि चीनमध्ये पंचसूत्रीय करार मॉस्कोमध्ये झाला असला तरी त्याने हुरळून जाण्याचे कारण नाही. कारण लबाडाचे आमंत्रण जेवल्याशिवाय खरे नाही. घुसखोरी करून बळकावलेल्या भागापैकी तसूभरही जमीन चीन परत करणार नाही याबाबत कोणाचेच दुमत नाही. गलवान खोऱयात 20 भारतीय सैनिकांच्या हौतात्म्याने चीनचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत हे परत एकदा कळून आलेले आहे. बलाढय़ झाल्यापासून चीनची हाव एखाद्या बकासुराप्रमाणे वाढत आहे हे साऱया जगाला हळूहळू कळून येत आहे. या बकासुराला इंगा दाखवायला भारत भीमाची भूमिका बजावणार की चीनने गिळंकृत केलेल्या प्रदेशावर पाणी सोडून मूग गिळून गप्प बसणार याकडे आंतरराष्ट्रीय जगताचे डोळे लागले आहेत.
चीनने भारताला बेसावध पकडून लडाखमधील मोक्मयाच्या ठिकाणी जी घुसखोरी केली आहे त्याने आपले राजकीय उद्दिष्ट क्वचितच साध्य केले आहे असे चीन अभ्यासकात मानले जात आहे. ‘आशियामध्ये आपल्या तोडीचा कोणी नाही’ असे चीनचे सर्वोच्च नेते शी जीन पिंग यांना जगाला दाखवायचे आहे. एकीकडे 21 वे शतक हे आशियाचे शतक आहे असे शी म्हणतात तर दुसरीकडे भारतीय सीमेत घुसखोरी करून हे शतक ‘चीनचे शतक’ आहे आणि इतर देश त्यापुढे गौण आहेत असे प्रत्यक्ष कृतीतून ते दाखवत आहेत. ‘गप गुमान रहा’ असा त्यांचा इतर देशांना अलिखित संदेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पं. नेहरूंपेक्षा थोर आणि इंदिरा गांधींपेक्षा जास्त ताकतवान आहेत असे त्यांचे प्रशंसक मानतात. स्वातंत्र्योत्तर भारतात मोदींएवढा लोकोत्तर पुरुष झाला नाही असेदेखील त्यांचे मत आहे. त्याच मोदींनी अजूनही चीनचे साधे नावदेखील घेतलेले नसल्याने राजकीय वर्तुळात एक अजब आश्चर्य मानले जात आहे. चीनला आपण ‘लाल आंख’ दाखवू असा प्रचार करून सहा वर्षापूर्वी सत्तेत आलेल्या मोदींनी लडाखमधल्या भेटीतदेखील उखाण्यातच बोलण्याचे काम केले. चीनलगतच्या सीमाभागात जाऊन ‘विस्तारवादी शक्तींचा’ बीमोड केला जाईल असे चीनचे नाव न घेता ते बोलले. पाकविरोधात बोलघेवडे असलेले भाजप नेते चीनबाबत ‘मौनी बाबा’ बनतात असे विचित्र दृश्य आजकाल बघायला मिळत आहे.
भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्यानुसार तर मॉस्कोमधील चीनबरोबरील वाटाघाटींमध्ये भारताने नांगी टाकल्याचे स्पष्ट संकेत दोन्ही देशांनी नंतर काढलेल्या पत्रकावरून दिसून येत आहे. चीनबाबत ज्ये÷ अभ्यासक असलेल्या स्वामी यांचा दावा आहे की चीनने भारताच्या प्रदेशातील घुसखोरी मागे घेतली पाहिजे आणि एप्रिलपूर्वी असलेली सीमेवरील यथास्थिती बहाल केली पाहिजे असा आग्रह संयुक्त पत्रकात भारताने धरलेला नाही. भारताला युद्ध नको असेल तर अशी नमती भूमिका घेतली पाहिजे असा चीनचा आग्रह आहे असे स्वामी म्हणतात.
मोदी हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठे मुत्सद्दी आहेत असे त्यांचे प्रशंसक सांगत असले तरी चीनच्या या घुसखोरीच्या विरोधात कोणत्याही देशाने भारताची बाजू घेतलेली नाही हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. याचा अर्थ चीनच्या या दादागिरीने इतर राष्ट्रे चूप आहेत असा नाही. दुबळय़ाच्या मागे कोणी उभे राहत नसते हा जगाचा नियम आहे. सध्या तरी चीनसमोर भारत दुबळा आहे असे आशियामधील आणि इतरत्रच्या बऱयाच देशांना वाटत आहे. दक्षिण चीन समुद्रात चीनची अरेरावी वाढल्याने इंडोनेशिया, फिलिपिन्स, मलेशिया, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, जपान, व्हिएतनाम, दक्षिण कोरिया असे बरेच देश अस्वस्थ आहेत. जर हिमालयात भारताने चीनचे नाक ठेचले तर या देशाना ते हवे आहे. मोदी या देशांची अपेक्षा पूर्ण करणार काय हे अजूनही अस्पष्ट आहे. लडाखमध्ये भारतीय सैन्य जय्यत सज्ज ठेवण्यासाठीच दिवसाकाठी 150 कोटी रु. लागत आहेत आणि चीनने तर हजारो कि.मी. विस्तार असलेल्या या सीमेवर इतर काही ठिकाणीदेखील फौजांची जमवाजमव केल्याने भारताला तिथेदेखील पुरेशी तयारी करावी लागलेली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा दर उणे 23.75 इतका जबर घरंगळला असल्याने चीन खरोखरच भारताची परीक्षाच घेत आहे. जर पुढील पाच-सहा महिने दोन्ही देशांच्या फौजा समोरासमोर उभ्या ठाकल्या तरी त्याचा हजारो कोटी रु.चा अतिरिक्त खर्च येणार आहे. चीनला या खर्चाची अजिबात फिकीर नाही कारण त्याची अर्थव्यवस्था भारताच्या किमान चौपट आहे. साऱया जगात कोरोना महामारीने हाहाकार माजवला असला तरी चीनने तीवर केव्हाच काबू साधला आहे. चीनचा विकासदर सध्या 3.2 असून प्रगत देशात तो सर्वात जास्त समजला जातो. चिनी ऍप्सवर बंदी घालून ड्रगनला आपण जेरीला आणू अशा नादात भारतात कोणी असेल तर तो भंपकपणा असून दुसरे तिसरे काही नाही असे आंतरराष्ट्रीय राजकारणातील जाणकार सांगत आहेत. अशा कृतीमुळे चीनचे काहीच वाकडे होत नाही असे त्यांचे मत आहे. मोदी पंतप्रधान झाल्यापासून चीन बरोबरील भारताचा व्यापार फार मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. चीनला आर्थिकदृष्टय़ा मोठी झळ बसेल असे कोणतेच निर्णय मोदी सरकारने अजून घेतलेले नाहीत. याचा अर्थ भारत-चीन संबंधांचे गाडे परत रुळावर आणण्याची वेडी आशा बाळगली जात आहे.
या आठवडय़ात सुरू होत असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आता या पंचसूत्रांचे गाजर दाखवून विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न केला जाणार की पंतप्रधान उघड उघड चीनला आव्हान देणार ते दिसून येणार आहे. पुलवामाच्या दहशतवादी घटनेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला ‘घर में घूस के मारेंगे’ असा सज्जड दम देणारे पंतप्रधान चीनबाबत अजून काहीच बोललेले नाहीत. मोदी हे नेहरूंपेक्षा थोर आणि इंदिरा गांधींपेक्षा जास्त ताकतवान असे त्यांचे प्रशंसक मानतात. 56 इंची छातीचा दावा करणाऱया मोदींपुढे पर्वताएवढे आव्हान शींनी उभे केले आहे. आता ‘हा सूर्य आणि हा जयद्रथ’ मोदी कधी आणि कसा करणार हे लवकरच दिसणार आहे. चीनपुढे मोदी नमले असा कोणत्याही प्रकारे संदेश जाणे पंतप्रधानांना परवडणारे नाही.
सुनील गाताडे








