ऑनलाईन टीम / बीजिंग :
कोरोनाचे संकट गडद असतानाच चीनमध्ये नवा स्वाइन फ्लू सापडल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. जी-4 असे या स्वाइन फ्लू ला नाव देण्यात आले आहे. डुकरांमधून हा फ्लू पसरतो. कोरोना काळात या स्वाइन फ्लूचा संसर्ग पसरला तर तो गंभीर रुप धारण करेल, असे चीनमधील संशोधकांनी म्हटले आहे.
जी-4 या फ्लू संदर्भातील अहवाल अमेरिकन सायन्स जर्नल PANS मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. या अहवालानुसार, जी-4 या फ्लू चा शोध घेण्यासाठी संशोधकांनी 2011 ते 2018 या कालावधीत संशोधन केले. त्यासाठी 10 राज्यातील 30 हजार डुकरांच्या नाकातील नमुने घेतले. या नमुन्यांच्या तपासणीनंतर चीनमध्ये 179 प्रकारचे फ्लू असल्याचे स्पष्ट झाले.
जी-4 हा फ्लू माणसांमध्ये वेगाने पसरू शकतो. कोरोनाच्या संकटात हा फ्लू पसरला तर तो गंभीर रुप धारण करेल, असे चीनच्या सेंटर फॉर डिजिस कंट्रोल अँड प्रिव्हेंन्शनच्या संशोधकांनी म्हटले आहे.









