अमेरिकेच्या तुलनेत तीनपट अधिक प्रमाण : संसर्गावर नियंत्रण शक्य : जगभरात 93,80,725 कोरोनाबाधित :
जगभरात कोरोना विषाणूची लागण आतापर्यंत 93 लाख 80 हजार 609 जणांना झाली आहे. यातील 50 लाख 68 हजार 402 बाधितांनी महामारीतून मुक्तता मिळविली आहे. तर महामारीच्या प्रारंभापासून आतापर्यंत देशात 9 कोटी लोकांची चाचणी करण्यात आल्याचा दावा चीनने बुधवारी केला आहे. हा आकडा अमेरिकेपेक्षा 3 पट अधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 2.95 कोटी लोकांच्या चाचण्या पार पडल्या आहेत.
ब्राझील : 52 हजार बळी

दक्षिण अमेरिका आणि कॅरेबियन देशांमध्ये कोरोना संसर्गामुळे 1 लाखापेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर बाधितांचे प्रमाण 20 लाखांपेक्षा अधिक झाले आहे. यातही ब्राझीलमध्ये सर्वाधिक 52 हजार जणांना जीव गमवावा लागला आहे. तर 11 लाख 51 हजार 479 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. ब्राझीलमध्ये दिवसभरात 40 हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडले आहेत.
इस्रायल : बाधितांमध्ये भर

इस्रायलमध्ये एका दिवसात सर्वाधिक 430 नवे बाधित आढळले आहेत. देशातील रुग्णांचे प्रमाण आता 21,512 झाले आहे. इस्रायलमध्ये सद्यकाळात 5,335 सक्रीय रुग्ण आहेत. तर 308 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर 15 हजार 869 जणांना संसर्गापासून मुक्तता मिळाली आहे. इस्रायलच्या विशेष मंत्रिस्तरीय समितीने सर्वाधिक बाधित शहर एलाड आणि तिबरियासला ‘प्रतिबंधित क्षेत्र’ घोषित केले आहे.
कोलंबिया : टाळेबंदी वाढली

कोलंबियाचे राष्ट्रपती इवान डूक्यू यांनी मंगळवारी रात्री उशिरा देशात लागू टाळेबंदीचा कालावधी 15 जुलैपर्यंत वाढविण्याची घोषणा केली आहे. प्रशासनाने 1 जूनपासून टाळेबंदीचे निर्बंध शिथिल करण्यास प्रारंभ केला आहे. देशात 25 मार्चपासून टाळेबंदी लागू आहे. कोलंबियाने मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला गतिमान करण्यासाठी अनेक टप्प्यांमध्ये देश खुला करण्याचे सत्र आरंभिले आहे. देशात आतापर्यंत 73,572 रुग्ण सापडले असून 2,404 बाधितांना जीव गमवावा लागला आहे.
स्लोवाकिया : अध्यक्ष क्वारंटाइन

स्लोवाकियाच्या अध्यक्ष जुजाना कपुटोव्हा यांनी ऑस्ट्रियाच्या राष्ट्रपतींसोबत होणारी बैठक रद्द केली आहे. जुजाना यांच्या कार्यालयातील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर जुजाना यांनी क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे. अध्यक्ष कपुटोव्हा शुक्रवारपर्यंत क्वारंटाइन राहणार असून या कालावधीतील त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. स्लोवाकिया युरोपमधील सर्वात कमी बाधित देश आहे.
द. कोरियात रुग्ण वाढले

दक्षिण कोरियात मागील 24 तासांमध्ये 51 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. देशातील रुग्णसंख्या आता 12,535 झाली आहे. स्थानिक आणि विदेशाशी संबधित रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. 5 दिवसांनी देशात 50 पेक्षा अधिक रुग्ण सापडले आहेत. नव्या रुग्णांमध्ये 20 विदेशी नागरिकांचा समावेश आहे.
टेक्सास : 5 हजार नवे रुग्ण

अमेरिकेच्या टेक्सास प्रांतात दिवसभरात 5 हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडले आहेत. कोरोनाचा फैलाव प्रत्यक्षात आव्हान नसल्याचे प्रांतातील बहुतांश लोकांचे मानणे आहे. प्रांतात कोरोनाचा वेगाने फैलाव असून स्थिती गंभीर होत आहे. लोकांनी घरातच थांबावे असे आवाहन गव्हर्नर ग्रेग एबॉट यांनी केले आहे.
अमेरिकेत 2 कोटी चाचण्या

अमेरिकेतील अग्रगण्य आरोग्यतज्ञ डॉ. अँथनी फौसी यांनी देशात संसर्गाची दुसरी लाट उद्भवण्याची शंका व्यक्त केली आहे. देशातील अनेक प्रांतांमध्ये रुग्ण वाढत आहेत. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना चाचण्या कमी करण्याचा सल्ला कधीच दिला नव्हता असा दावा चार आरोग्यतज्ञांनी केला आहे. ओक्लाहोमा येथील प्रचारसभेत ट्रम्प यांनी चाचण्यांचे प्रमाण कमी करण्याचा सल्ला प्राप्त झाल्याचे म्हटले आहे. अमेरिकेत चाचण्यांचे प्रमाण अधिक असून हेच वास्तव आहे. देशात आतापर्यंत 2 कोटींपेक्षा अधिक चाचण्या पार पडल्याचे फौसी यांनी सागितले आहे.









