वृत्तसंस्था /बीजिंग :
चीनमध्ये सध्या पूरामुळे जनजीवन कोलमडून पडले आहे. दक्षिण-पश्चिम चीनमध्ये यांग्जी नदीला आलेल्या पुरामुळे 1 लाखांहून अधिक लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे लागले आहे. तसेच सिचुआन प्रांतात 1200 वर्षे जुन्या 233 फूट उंचीच्या भगवान बौद्धांच्या पुतळय़ाला धोका निर्माण झाला आहे.
बुद्धांचा पुतळा वाचविण्यासाठी पोलीस आणि स्थानिक नागरिक वाळूने भरलेली पोती टाकून पाण्याचा प्रवाह संथ करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 1949 नंतर पहिल्यांदाच पुराचे पाणी पुतळय़ाच्या पायांच्या बोटांपर्यंत पोहोचले आहे.
25 अब्ज डॉलर्सचे नुकसान
चीनच्या अधिकृत पीपल्स डेली या वृत्तपत्रानुसार पुरामुळे भूस्खलनाच्या घटनाही घडल्या आहेत. तेथील युनान प्रांतात 5 जण बेपत्ता झाले आहेत. सिचुआनच्या यिबिनमध्ये रस्ता खचल्याने 21 वाहने वाहून गेली आहेत. पूरसंकटामुळे चीनमध्ये आतापर्यंत 200 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता आहेत. अधिकाऱयांनुसार पुरामुळे 25 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. यांग्जी जलसंदा आयोगाने पूरासंबंधी रेट अलर्ट घोषित केला होता. यांग्जी नदीला 1981 नंतरचा सर्वात भीषण पूर आला आहे. सियाकिको या ऐतिहासिक शहरातील सखल भागांमध्ये घरांच्या छतापर्यंत पाणी पोहोचले आहे.









