600 किमी प्रतितासाच्या वेगाने धावणारी रेल्वे
चीनने वाऱयाहून अधिक वेगवान असलेल्या मॅग्लेव ट्रेनचे अनावरण केले आहे. ही रेल्वे 600 किलोमीटर प्रतितासाहून अधिक वेगाने धावणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. ही रेल्वे हाय टेंपरेचर सुपरकंडक्टिंग पॉवरवर धावणारी आहे. ही रेल्वे धावत असताना पाहिल्यास ती चुंबकीय मार्गावर तरंगत असल्याचा आभास होतो. याचमुळे या रेल्वेला ‘फ्लोटिंग ट्रेन’ही म्हटले जात आहे.
600 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने धावणाऱया या रेल्वेला बीजिंगहून शांघायमध्ये पोहोचण्यासाठी केवळ अडीच तास लागणार आहेत. दोन्ही शहरांमधील अंतर 1 हजार किलोमीटरपेक्षा अधिक आहे. मॅग्लेव ट्रेन देशात विमानाने प्रवास करणाऱया लोकांसाठी एक चांगला पर्याय ठरू शकते असे सांगण्यात येत आहे.
शांघायपासून बीजिंगदरम्यानचे अंतर 1 हजार किलोमीटरहून अधिक आहे. तर विमानाने शांघायहून बीजिंगमध्ये पोहोचण्यासाठी सुमारे 3 तासांचा कालावधी लागतो. तर चीनच्या हायस्पीड रेल्वेने जाण्यास सुमारे साडेपाच तासांचा कालावधी लागतो.
मागील 20 वर्षांपासून चीन मॅग्लेव ट्रेन तंत्रज्ञानावर काम करत आहे. चीनचे सर्वात मोठे औद्योगिक शहर शांघायमध्ये मॅग्लेव ट्रेनचा छोटा रेल्वमार्ग देखील असून जो विमानतळ आणि शहराला जोडतो. पण आता चीनने शहरांना जोडण्यासाठी मॅग्लेव ट्रेन चालविण्याची योजना आखली आहे.
प्रारंभी शांघाय शहरापासून चेंकदू शहरादरम्यान ही रेल्वे धावणार आहे. या रेल्वेची लांबी सुमारे 69 फूट आहे. मॅग्लेव ट्रेनला चीनचे किनारी शहर किंगदाओमध्ये तयार करण्यात आले आहे. जपान, जर्मनीसह अनेक देश मॅग्लेव नेटवर्क विकसित करण्याचा विचार करत आहे. या देशांसाठी मोठा खर्च आणि सद्यकाळातील रेल्वेमार्ग हे स्वप्न साकार करण्यासाठी अडथळा ठरले आहे.