कोरोनाची उत्पत्ती कुठून झाली, हा विषाणू नेमका कुठून आला, याचा तपास करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ञांचे एक पथक पुन्हा एकदा चीनच्या दौऱयावर जाणार आहे. चीनने सोमवारी यासंबंधी माहिती दिली आहे. कोरोनाविषयक तपासासाठी तज्ञांचे पथक 14 जानेवारी रोजी चीनच्या दौऱयावर असणार आहे. हे पथक चीनमध्ये कोरोनाशी निगडित आकडेवारी आणि पुरावे जमा करणार आहे.
वुहानला जाणार का?
जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ञांच्या पथकाला वुहानचा दौरा करू देणार की नाही हे चीनने अद्याप स्पष्ट केलेले नाही. वुहानमधूनच कोरोना महामारीस प्रारंभ झाला होता. डब्ल्यूएचओच्या पथकाच्या वुहान येथील दौऱयासंबंधी निर्णय घेण्यात आलेला नसल्याचे चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाचे उपप्रमुख जेंग यिक्सिन यांनी म्हटले आहे.
डब्ल्यूएचओकडून नाराजी व्यक्त
डब्ल्यूएचओच्या तज्ञांच्या पथकाच्या चीन दौऱयासाठी दीर्घकाळापासून चर्चा सुरू आहे. डब्ल्यूएचओ प्रमुख टेड्रोस घेब्रयेसिस यांनी मागील आठवडय़ात चीनच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली होती. चीनने यापूर्वी तज्ञांच्या पथकाच्या दौऱयाला ऐनवेळी अनुमती नाकारली होती.