संशोधनाचा निष्कर्ष, युरोपात स्थिती चिंताजनक, पुढील दोन महिने ठरणार निर्णायक
चीनमधील जैविक प्रयोगशाळांमध्ये जगभरात आज थैमान घालणाऱया कोरोना विषाणूचा जन्म झाला, असा आरोप करण्यात येत आहे. आता आणखी एका संशोधनामुळे पुन्हा चीनकडेच कोरोना प्रसारासाठी अंगुलीनिर्देश करण्यात येत आहे. या देशातील कोल्हय़ासारखे दिसणारे रॅकून डॉग्ज हे केसाळ प्राणी कोरोना विषाणूचा मानवांमध्ये प्रसार वेगाने करतात असे आढळून आले आहे. या प्राण्यांचे पुनरूत्पादन चीनच्या हेबेई प्रांतात खासगी केंद्रांमध्ये केले जाते. अशी अनेक केंद्रे त्या प्रांतात असून मोठय़ा प्रमाणावर या प्राण्यांचे संवर्धन केले जाते.
रॅकून डॉग्ज हे प्राणी छोटय़ा कोल्हय़ांप्रमाणे दिसतात. त्यांना सार्स कोव्हीड 2 या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो, असे दिसून आले आहे. प्रामुख्याने लोकरीसाठी आणि काही प्रमाणात खाण्यासाठीसुद्धाय् या प्राण्यांचा उपयोग चीनमध्ये केला जातो. यासाठी त्यांचे संवर्धन अनेक खासगी व सरकारी केंद्रांमध्ये केले जाते. या प्राण्यांपासूनदेखील प्रथम चीनच्या काही भागांमध्ये हा विषाणू प्रसारित झाला आणि नंतर चीनी प्रवाशांनी तो जगभर नेला असाही तर्क मांडण्यात येत आहे. तथापि, हा तर्क अद्याप प्राथमिक अवस्थेत असून अधिक संशोधन सुरू आहे.
सार्सपासून कोव्हीड 19
या प्राण्यांच्या लाळेत आणि नाकातून गळणाऱया द्रवात मोठय़ा प्रमाणात सार्स कोव्हीड 2 या रोगाचे विषाणू आढळून आले आहेत. याच सार्स विषाणूंपासून कोव्हीड 19, अर्थात आजचा कोरोना विषाणू विकसीत झाला आहे. त्यामुळे अद्यापही सार्सच्या विषाणूवर संशोधकांकडून प्रयोग सुरू आहेत. सार्स विषाणूची रचना समजल्यामुळे कोव्हीड 19 ची रचना समजणे सोपे झाले आहे.
पत्ता न लागता प्रसार
रॅकून डॉग्ज या प्राण्यांचे पुनरूत्पादन चीनच्या विविध भागांमध्ये लोकरीसाठी मोठय़ा प्रमाणावर केले जाते. दरवर्षी लक्षावधींच्या संख्येने बंदिस्त जागेत त्यांचे संवर्धन केले जाते. हे संवर्धन करणारी कित्येक केंद्रे चीनमध्ये आहेत, असे सांगितले जाते. हेबेई प्रांत यासाठी प्रसिद्ध आहे. या प्राण्यांपासून व त्यांच्या लोकरीपासूनही न कळत कोव्हीड 19 चा प्रसार झाला आहे, असे तज्ञांचे मत आहे. मात्र, या प्राण्यांना सार्सचा संसर्ग कसा व कोठून झाला याचे उत्तर मिळाल्याखेरीज कोरोनाचे मूळ शोधता येणार नाही, असाही मतप्रवाह आहे.
अन्य प्राण्यांवरही संशोधन सुरू
लोकरीच्या उत्पादनासाठी पाळल्या जाणाऱया अन्य केसाळ प्राण्यांपासून कोरोनाचा प्रसार होऊ शकतो का, यावरही जगात संशोधन केले जात आहे. बहुतेक प्राण्यांना कोरोनाची लागण होत नाही आणि त्यामुळे त्यांच्यापासून मानवाला संसर्ग होण्याची शक्यता नाही, हे दिसून आले असले तरी प्राण्यांची परीक्षणे केली जात आहेत.
युरोपात चिंताजनक परिस्थिती
युरोपात कोरोनाच्या दुसऱया लाटेने उग्र स्वरूप धारण केले आहे. पहिल्या लाटेपेक्षाही तीव्रतेने दुसऱया लाटेत विषाणूचा प्रसार होत आहे.
विषाणू मानवनिर्मित की नैसर्गिक
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रॅकून डॉग्जसारख्या प्राण्यांमध्ये झालेला दिसून आला असला आणि त्यांच्यापासून मानवाला त्याची लागण झाली, हे देखींल दिसून आले असले तरीही हा विषाणू मानवनिर्मित की नैसर्गिक हा प्रश्न अद्यापही कायम असून तो मानवनिर्मित असल्याचा संशय आजही कमी झालेला नाही. कारण रॅकून डॉग्ज सारख्या विषाणू प्रसारक प्राण्यांचे पुनरूत्पादन अनेक देशांमध्ये केले जाते. तथापि, 2002 मध्ये सार्स आणि सध्या कोव्हीड 19 या विषाणूंचा जगभर प्रसार चीनमधूनच झालेला आहे, हे निर्विवादपणे सिद्ध झालेले आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा नवा प्रसारक शोधला गेलेला असला तरी हा विषाणू मानवनिर्मित की नैसर्गिक हा प्रश्न मिटलेला नाही.









