वुहान / वृत्तसंस्था :
चीनमध्ये आतापर्यंत कोरोना विषाणूचे 571 रुग्ण आढळून आले आहेत. तसेच तेथे 17 जणांना या विषाणूच्या संसर्गामुळे जीव गमवावा लागला आहे. वुहान तसेच हुआंगगैंग शहरातून बाहेर जाणारी सर्व उड्डाणे तसेच रेल्वे गुरुवारपासून बंद करण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक कारण नसताना लोकांना घरातून बाहेर न पडण्याची सूचना करण्यात आली आहे. या निर्णयानंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वुहान शहराची लोकसंख्या 1.1 कोटी आहे. तर हुआगंगैंग शहरात 75 लाख लोकांचे वास्तव्य आहे. या दोन्ही शहरांमधून बाहेर पडणाऱया सर्व वाहनांची तपासणी केली जाणार आहे. तसेच चित्रपटगृहे बंद ठेवण्यात येणार आहे. तर झोऊ शहरातील रेल्वेस्थानक गुरुवार रात्रीपासून बंद राहणार आहे.
वुहानमधून अखेरचे विमानोड्डाण ऑस्ट्रेलियाकरता झाले आहे. सर्व प्रवाशांनी मास्क परिधान केला होता तसेच त्यांची आरोग्य अधिकाऱयांकडून तपासणी करण्यात आली आहे. या प्रवाशांना कोरोना विषाणूच्या लक्षणांसंबंधी माहिती देण्यात आली आहे. कुठलाही प्रवासी आजारी नसल्याची माहिती ऑस्ट्रेलियाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी ब्रेंडन मर्फी यांनी दिली आहे.
31 डिसेंबर रोजी पहिला रुग्ण
वाहतूक बंद केल्याने चीनला स्वतःच्या देशात विषाणूचा प्रकोप नियंत्रित करता येणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर तो फैलावण्याची शक्यता कमी होईल असे डब्ल्यूएचओ प्रमुखांनी सांगितले आहे. चीनमध्ये या विषाणूचा संसर्ग हजारो लोकांना झाला आहे. कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण वुहान शहरात 31 डिसेंबर रोजी आढळून आला होता. कोरोना विषाणू एसएआरएस (सीवियर ऍक्यूट रेसिपिरेटरी सिंड्रोम-सार्स) सारखा असल्याने धोका कायम आहे. सार्समुळे 2002-03 मध्ये चीन आणि हाँगकाँगमध्ये 650 जणांचा बळी गेला होता. कोरोनालाही सार्स विषाणूच्या शेणीत ठेवण्यात आले आहे.
विमानतळ, बसस्थानकात तपासणी
चीनमध्ये नववर्ष साजरा करण्यासाठी चालू आठवडय़ात लाखो लोक दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आरोग्य आयोगाने विमानतळ, बसस्थानक, रेल्वेंमध्ये लोकांची तपासणी सुरू केली आहे. बीजिंग, शांघाय आणि चोंककिंगसह उत्तरपूर्व, मध्य आणि दक्षिण चीनमधूनही कोरोना विषाणूची प्रकरणे समोर आली आहेत. जपान, मकाऊ, दक्षिण कोरिया, तैवान, थायलंड आणि अमेरिकेतही याचे रुग्ण मिळाले आहेत.
कोरोनाचा फैलाव
देश रुग्ण मृत्यू
चीन 571 17
थायलंड 4 0
जपान 0 0
मकाऊ 1 0
दक्षिण कोरिया 1 0
तैवान 1 0
अमेरिका 1 0
वुहानमध्ये 1300-1700 रुग्ण
वुहानमध्ये 1300 ते 1700 लोक संक्रमित असू शकतात असे हाँगकाँग आाि ब्रिटिश वैज्ञानिकांनी म्हटले आहे. नियमितपणे हात धुवत रहा, गर्दीयुक्त ठिकाणी जाणे टाळा, मोकळय़ा हवेत श्वास घ्या आणि खोकल्याचा त्रास असल्याचा मास्क वापरला जावा. ताप आल्यास डॉक्टरांशी संपर्क साधण्यात यावा असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. स्थानिक सरकारने सर्व महत्त्वाचे सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. 3-9 फेब्रुवारी रोजी होणाऱया महिला ऑलिम्पिक फुटबॉल पात्रता सामना नानजिंग शहरात स्थलांतरित करण्यात आला आहे.
डब्ल्युएचओचे पथक
वुहान शहराची नाकेबंदी केली जाण्यापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने स्वतःच्या स्थानिक प्रतिनिधी गॉडेन गालिया यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ स्थितीचा आढावा घेण्यासाठी पाठविले आहे. या शिष्टमंडळाने चीनमधील जैवसुरक्षा प्रयोगशाळा, रुग्णालये आणि विमानतळांचा दौरा करत आरोग्य कर्मचारी, आपत्ती निरीक्षक तसेच शहरांच्या अधिकाऱयांशी चर्चा केली आहे.
भारतही दक्ष
चीनमध्ये फैलावलेल्या कोरोना या जीवघेण्या विषाणूवरून भारतही तेथे राहत असलेल्या स्वतःच्या नागरिकांबद्दल चिंतेत पडला आहे. भारताने मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. चीनमधून येणाऱया लोकांना थर्मल स्क्रीनिंगला सामोरे जावे लागणार आहे. तसेच तेथे राहत असलेल्या भारतीयांना दक्ष रहावे लागणार असल्याचे विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले आहे.









