वृत्तसंस्था/ बीजिंग
चीनमधील सानिया येथे 28 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान आयोजित आशियाई बीच क्रीडा स्पर्धा कोरोना महामारी समस्येमुळे लांबणीवर टाकण्याचा निर्णय स्पर्धा आयोजकांनी घेतला आहे. आता या स्पर्धेची पुढील तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे सांगण्यात आले आहे.
सहावी आशियाई बीच क्रीडा स्पर्धा नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान निश्चित केली होती. पण चीनमधील कोरोना परिस्थितीचे अवलोकन करून या देशाच्या क्रीडा विभाग प्रशासकीय समितीने सदर स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. 2020 च्या कालावधीत चीनमध्ये केवळ 2022 बीजिंग येथे होणाऱया हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेसाठीची आंतरराष्ट्रीय पात्र फेरी स्पर्धा घेतली जाईल, असा खुलासा चीनच्या क्रीडा प्रशासकीय विभागाकडून करण्यात आला आहे. चीनमध्ये 16 ते 20 डिसेंबर दरम्यान विश्व बॅडमिंटन टूरवरील अंतिम स्पर्धा घेतली जाणार आहे. पण, चीनकडून या स्पर्धेसंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसून विश्व बॅडमिंटन फेडरेशनला चीनच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे.









