ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारत आणि चिनी सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर दोन्ही देशातील तणाव आणखी वाढला आहे. त्यामुळे तिन्ही दलाच्या प्रमुखांना चीनच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच चीनने आक्रमकपणा दाखवल्यास जशास तसे उत्तर देण्याचे पूर्ण अधिकार भारतीय लष्कराला देण्यात आल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.
संरक्षण मंत्रालयाची आज तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांशी बैठक पार पडली. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना लडाखमधील परिस्थितीची माहिती देण्यात आली. सोमवारी राजनाथ सिंग रशिया दौऱ्यावर जाणार असल्याने त्यांनी नियंत्रण रेषेजवळ हवाई तसेच समुद्र मार्गावर चीनच्या हालचालींवर सर्व प्रमुखांना नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
नियंत्रण रेषेवर मोठ्या प्रमाणात तणाव असल्यामुळे भारत यापुढे चीनपासून नियंत्रण रेषेचे रक्षण करण्यासाठी वेगळी रणनीती आखत आहे. सध्या समोरासमोर उभे ठाकलेल्या सैनिकांमध्ये तणाव, संतापाची भावना अधिक आहे. त्यामुळे पुन्हा 15 जूनची पुनरावृत्ती होऊ शकते. चीनने नियंत्रण रेषेवर आक्रमकपणा दाखवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना जशास तसे उत्तर द्या, असे आदेश देण्यात आल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे.