ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
Weibo आणि Baidu Search या चीनमधील दोन प्रसिद्ध अॅपवरही भारताने बंदी घातली आहे. भारताने यापूर्वीही डिजिटल स्ट्राइक करत टिकटॉकसह 47 चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे.
Weibo हे अॅप चीनचे ट्विटर म्हटले जाते. तर Baidu Search हे चीनचे स्वत: चे सर्च इंजिन आहे जे गूगलप्रमाणे कार्य करते. भारताने या दोन्ही अॅपवर बंदी घातली. त्यानंतर हे दोन्ही अॅप गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल प्ले स्टोअरवरून हटवण्यात आले आहेत.
Weibo हे अॅप ट्विटरप्रमाणे असल्याने 2015 मध्ये चीनच्या भेटीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनच्या या मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर अकाउंट उघडले होते. Weibo च्या एका स्टार युझरपैकी मोदी एक होते. 2009 मध्ये चीनने हे अॅप सुरू केले होते. या अॅपचे 50 कोटींहून अधिक युझर आहेत. तर Baidu Search हे अॅप गुगलप्रमाणे काम करत असल्याने ते भारतात पाय रोवण्याचा प्रयत्न करत होते.
दरम्यान, भारत सरकारने चीनच्या 275 अॅप्सची यादी तयार केली आहे. ही अॅप्स वापरकर्त्यांसाठी आणि राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी किती योग्य आहेत, याची चाचणी सध्या सुरू आहे. त्यानंतर ही अॅप्स बंद करण्याचा निर्णय सरकार घेणार आहे.