अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचा इशारा, चीनला रोखण्याची आवश्यकता व्यक्त
@ वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
शांततावादी जगासमोर चीनचे गंभीर आव्हान उभे आहे. भारत-प्रशांतीय क्षेत्रात चीनच्या आक्रमकपणामुळे स्थिती चिघळण्याची शक्यता असून चीनला वेळीच रोखण्याची आवश्यकता आहे, असे महत्वपूर्ण प्रतिपादन अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टीन यांनी गुरुवारी केले. ते सिनेट समितीसमोर बोलत होते.
अमेरिकेच्या संसदेचे वरीष्ठ सभागृह म्हणून ओळखल्या जाणाऱया सिनेटमध्ये सध्या अमेरिकेच्या संरक्षण अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे. चीनला रोखायचे असेल तर त्याच्यावर लक्ष ठेवावयास हवे. तसेच दोन्ही देशांच्या सेनांमध्ये थेट संपर्क प्रस्थापित करण्याची आवश्यकता आहे. दोन्ही देशांच्या सरकारांमध्ये आणि अधिकाऱयांमध्येही असा संपर्क असला पाहिजे. चीनच्या हालचाली अमेरिकेला वेळीच समजून घेतल्या पाहिजेत, अशी विधानेही त्यांनी केली.
मित्रराष्ट्रांशी संपर्कसातत्य
चीनच्या हालचाली समजून घेण्यासाठी अमेरिकेला सातत्याने मित्रदेशांशी संपर्कात राहण्याची आवश्यकता आहे. तशी यंत्रणा स्थापन करण्यात आलेली आहे. चीनचा त्याच्या शेजारी असणाऱया राष्ट्रांवर दबाव असतो. शेजारी देशांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न तो देश करतो. अमेरिका चीनला शत्रूराष्ट्र मानत नाही. मात्र तो अमेरिकेचा स्पर्धक देश आहे, अशा अर्थाची वक्तव्ये त्यांनी केली.
चीन समुद्रावर दावा
दक्षिण चीनी समुद्राच्या जवळपास पूर्ण म्हणजे 13 लाख चौरस किलोमीटर भागावर आलीच सत्ता असावी असे चीनला वाटते. त्यामुळे या समुद्रात त्याने कृत्रिम बेटे तयार केली असून त्या बेटांवर त्याने सेनातळ उभारण्याचे काम हाती घेतले आहे. याच समुद्राच्या विविध भागांवर ब्रुनेई, मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपाईन्स आणि व्हिएतनाम यांचाही अधिकार आहे. मात्र, चीनच्या आक्रमक धोरणामुळे या देशांची कोंडी होऊ शकते, असे अमेरिकेचे प्रतिपादन आहे.
वेगवान स्पर्धक
चीनचे त्याच्या जवळच्या क्षेत्रात वेगाने हालचाली चालविलेल्या हालचाली पाहता तो अमेरिकेचा ‘वेगवान स्पर्धक’ होण्याची तयारी करत असल्याचे दिसते. त्यामुळे त्याच्या डावपेचांकडे अमेरिकेला दुर्लक्ष करता येणार नाही. अमेरिकेलाही स्पर्धेचा वेग वाढविला पाहिजे. यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान शोधणे आणि ते सतत अधिक आधुनिक करत राहणे हा पर्याय आहे. जगातील सर्वोत्तम शास्त्रज्ञ अमेरिकेकडे असावेत, अशी आमची इच्छा असून त्यासाठी प्रयत्न आहेत. आर्थिक आणि सामरिक दृष्टीने अमेरिकेला सज्ज ठेवले जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
अनेक प्रश्न विचारले
सिनेटच्या सदस्यांनी चीनसंदर्भात ऑस्टीन यांना अनेक प्रश्न विचारले. तसेच अमेरिकेच्या तयारीचा आढावा घेतला. यंदा अमेरिकेने संरक्षण खर्चात वाढ करण्यासाठी पावले उचलली आहेत. हा वाढीव खर्च करण्याची आवश्यकता आहे का, यासंदर्भातही सदस्यांनी ऑस्टीन यांना प्रश्न विचारले.
व्यापक महत्वाकांक्षा
चीनची महत्वाकांक्षा व्यापक आहे. त्याला या जगाच्या पाठीवरचे सर्वात प्रबळ आणि वर्चस्ववादी राष्ट्र बनायचे आहे. त्याचे मध्यमकालीन आणि दीर्घकालीन धोरण हेच आहे. त्यामुळे त्याला अमेरिकेशी स्पर्धा करायची असून तसा प्रयत्न तो देश करत असतो. केवळ सामरिक सामर्थ्यातच नव्हे, तर आर्थिक आणि इतर सर्व बाबींमध्ये अमेरिकेशी स्पर्धा करण्याची त्याची इच्छा असते. मात्र अमेरिका या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, असे प्रतिपादन ऑस्टीन यांनी केले.
अमेरिका सज्ज व सावध
ड चीनला रोखण्यासाठी मित्रराष्ट्रांसह अमेरिका सज्ज
ड चीनला काल्पनिक शत्रू मानू नका- चीनचे म्हणणे
ड चीनी सेना व प्रशासनाशी संपर्क हवा- अमेरिका
ड चीनशी सर्व बाबींमध्ये स्पर्धेस अमेरिकेची तयारी









