वृत्तसंस्था/ कॅनबेरा
ऑस्ट्रेलिया आणि चीन यांच्यात एका बनावट छायाचित्रावरून तणाव निर्माण झाला आहे. एक ऑस्ट्रेलियन सैनिक अफगाणी मुलाची हत्या करताना दाखविणारे ‘बनावट छायाचित्र’ चीनच्या प्रशासनाने हटवावे, अशी मागणी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी केली आहे. चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी ट्विटर खात्यावरून सोमवारी हे छायाचित्र प्रसारित केले होते.
चीन हा ऑस्ट्रेलियाचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार असला तरीही मागील काही काळापासून दोन्ही देशांदरम्यान अनेक मुद्दय़ांवरून थेट संघर्ष वाढला आहे.
कोरोना महामारीच्या उत्पत्तीची चौकशी करण्याची मागणी ऑस्ट्रेलियाने केल्याने चीनने आगपाखड केली होती. हाँगकाँग मुद्दय़ावरूनही ऑस्ट्रेलियाने चीनवर परखड टीका केली होती.
चीनचे घृणास्पद कृत्य
चीनने माफी मागावी, तसेच ट्विटरवरून संबंधित बनावट छायाचित्र हटवावे. चीनचे हे कृत्य आक्षेपार्ह असून कुठल्याही आधारावर त्याचा बचाव केला जाऊ शकत नाही. चीनच्या सरकारला स्वतःच्या या घृणास्पद कृत्याबद्दल लाज वाटायला हवी. चीनने सादर केलेले छायाचित्र बनावट असल्याचे उद्गार पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी पत्रकार परिषद घेत काढले आहेत.
व्यापारयुद्ध
चीन आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मागील काही काळापासून व्यापारयुद्ध सुरू आहे .चीनने मागील आठवडय़ातच ऑस्ट्रेलियाच्या वाइनवर प्रचंड शुल्क लादले आहे. चीनच्या वाणिज्य मंत्रालयानुसार ऑस्ट्रेलियन वाईनवर 107.1 टक्क्यांवरून 212. टक्क्यांपर्यंत आयातशुल्क आकारले जाऊ शकते. चीनने नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या कोळसा, साखर, गहू, वाइन, कॉपर आणि लाकडाच्या आयातीवर अनधिकृतपणे बंदी घातली होती.
चीनच्या उलटय़ा बोंबा
ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांवर टीकेवर चीननेही प्रतिक्रिया दिली आहे. ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानात गंभीर युद्ध गुन्हे केल्याचा आरोप चीनच्या विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्या हु चुनयिंग यांनी केला आहे. ऑस्ट्रेलियातील सहकारी एका वैयक्तिक ट्विटरवर अधिक प्रमाणात व्यक्त होत आहेत, परंतु ऑस्ट्रेलियाच्या सैनिकांनी निष्पाप लोकांची हत्या करणे त्यांना योग्य वाटते का? ऑस्ट्रेलियाने सार्थक विचार करून दोषींना शिक्षा करावी. अफगाणिस्तानच्या लोकांची ऑस्ट्रेलियाने माफी मागणे गरजेचे आहे. अशाप्रकारचे भयावह कृत्य पुन्हा करणार नसल्याचे आश्वासन ऑस्ट्रेलियाने आंतरराष्ट्रीय समुदायाला द्यावे असे खोचक विधान चीनकडून करण्यात आले आहे.









