अमेरिकेने मदत केल्यास सीपीईसी संपविण्याची इम्रान सरकारची तयारी
वृत्तसंस्था / इस्लामाबाद
आर्थिक संकट आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाकी पडत चालण्यासह चीनवरील सातत्याने वाढणाऱया निर्भरतेदरम्यान पाकिस्तानातील इम्रान खान सरकार चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (सीपीईसी) संपविण्यास तयार आहे. पाकिस्तानने सीपीईसी रद्द करण्याचा प्रस्ताव मांडल्याचे वृत्त एशिया टाईम्सने दिली आहे. अमेरिकेकडून अशाचप्रकारची मदत मिळाली तर पाकिस्तान सीपीईसी गुंडाळण्यास तयार आहे.
पाकिस्तान पुन्हा एकदा अमेरिकेसोबतचे संबंध सुधारण्याची धडपड करत आहे. पाकिस्तानला अमेरिकेकडून भरीव आर्थिक मदत मिळाल्यास तो चीनसोबतचा सीपीईसी रद्द करण्यास तयार असल्याचे मानले जातेय. अशाप्रकारचा प्रयत्न यापूर्वी देखील झाला आहे. जुलै 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या बेलआउट पॅकेज व्यतिरिक्त पाकिस्तानला फार काही मिळविता आले नव्हते. अमेरिकेने नोव्हेंबर 2021 मध्ये कतारला अफगाणिस्तानातील स्वतःचा राजनयिक प्रतिनिधी घोषित केल्यावर पाकिस्तानला मोठा झटका बसला होता.
ग्वादारमध्ये सीपीईसीला विरोध
सुमोर 2 वर्षांपासून सीपीईसीचे काम बंद असल्याने चीन अत्यंत नाराज आहे, कारण या प्रकल्पावर चीनने सुमारे 16 अब्ज डॉलर्स खर्च केले आहेत. इम्रान सरकार चीनची मनधरणी करून हा प्रकल्प सुरू करू पाहत आहे. परंतु काम सुरू होण्यापूर्वीच विरोध होऊ लागला आहे. बलूचिस्तानच्या ग्वादारमध्ये अनेक दिवसांपासून राजकीय पक्ष, नागरी अधिकार कार्यकर्ते, मच्छिमारांसह अन्य अनेक वर्गांचे लोक सीपीईसीच्या विरोधातील सरकारविरोधी आंदोलनांमध्ये सामील होत आहेत. सीपीईसीवर कुठल्याही प्रकारचे काम सुरू होण्यापूर्वी मूलभूत सुविधा देण्यात याव्यात, अनावश्यक तपासणी नाके हटविण्यात यावेत, पेयजल आणि वीज उपलब्ध करावी, मासेमारीचे मोठे ट्रॉलर्स हटविणे आणि इराण सीमा खुली करण्याची येथील लोकांची मागणी आहे.









