ऑनलाईन टीम / बीजिंग :
चीनच्या ‘सिनोवॅक बायोटेक’ आणि ‘सिनोफार्म’ या कंपन्यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या कोरोना लसीची चाचणी तिसऱ्या टप्प्यात आली आहे. सर्व चाचण्या यशस्वी पूर्ण केल्यानंतर या लसीचे उत्पादन सुरू होणार आहे. तत्पूर्वीच चीनने ही लस बीजिंग ट्रेड फेअरमध्ये प्रदर्शित केली.
चीनने बीजिंग ट्रेड फेअरच्या माध्यमातून ही लस जगासमोर आणली आहे. लसीच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्यानंतर डिसेंबर अखेरपर्यंत ही लस बाजारात आणण्याचा चीनचा प्रयत्न आहे. त्यासाठी एक स्वतंत्र कारखाना तयार ठेवण्यात आला आहे. हा कारखाना दरवर्षी 300 दशलक्ष डोसची निर्मिती करू शकतो.
कोरोनाला अटकाव घालण्यासाठी जगभरातील 150 हून अधिक देशात कोरोना लसीवर संशोधन सुरू आहे. त्यामधील 10 लसी क्लिनिकल चाचणीच्या अंतिम टप्प्यात आहेत. त्यामध्ये चीनचाही समावेश आहे. चीनने लसीच्या यापूर्वी घेतलेल्या मानवी चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. त्याचे कोणतेही साईड इफेक्ट समोर आले नसल्याचे राष्ट्रीय आरोग्य आयोगाने म्हटले आहे.









