दक्षिण चीन समुद्रात 3 विमानवाहू युद्धनौका तैनात : लढाऊ विमानांद्वारे गस्त
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
दक्षिण चीन समुद्रात चीनची वाढती अरेरावी रोखण्यासाठी अमेरिकेने हिंद आणि प्रशांत महासागरात 3 विमानवाहू युद्धनौका तैनात केल्या आहेत. सुमारे 3 वर्षांनी पहिल्यांदाच या क्षेत्रात 3 अमेरिकन विमानवाहू युद्धनौका गस्त घालत आहेत. याचबरोबर अमेरिकेच्या नौदलाचे क्रूजर, विध्वंसक नौका, लढाऊ विमाने आणि टेहळणी ड्रोन देखील सातत्याने गस्त घालत आहेत.
अमेरिका आणि चीन यांच्यातील वाढत्या तणावामुळे हिंदी आणि प्रशांत महासागरात हे शक्तिप्रदर्शन करण्यात आले आहे. अमेरिकेचे नौदल कोरोना संकटातून बाहेर पडल्याचेही संकेत यातून प्राप्त होत आहेत.
चीनला संदेश
हाँगकाँगवरील वाढीव नियंत्रण करण्याची पावले आणि दक्षिण चीन समुद्रातील कृत्रिम बेटांवर सैन्याच्या तैनातीच्या चीनच्या निर्णयावर अमेरिकेने सडकून टीका केली आहे. कोविड-19 मुळे अमेरिका त्रस्त असल्याने त्याची सैन्यसज्जता घटल्याचा दावा चीनमधून केला जात होता. याच कारणामुळे अमेरिकेने चीनला स्वतःचे सामर्थ्य दाखवून दिल्याचे सेंटर फॉर स्ट्रटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीजमधील चीनसंबंधी तज्ञ बोनी ग्लेजर यांनी म्हटले आहे.
कोरोनावरून चीन लक्ष्य
अमेरिकेत कोरोना महामारी रोखण्याच्या उपाययोजनांवरून टीकेला सामोरे जाणारे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याप्रकरणी चीनला लक्ष्य करण्याचे सत्र आरंभिले आहे. चीनने कोविड-19 च्या धोक्यासंबंधी जगाला योग्यवेळी सतर्क केले नसल्याचा आरोप त्यांनी जाहीरपणे केला आहे. अमेरिकेच्या सुरक्षा धोरणात चीनला प्रमुख चिंतेचे कारण मानण्यात आले आहे.
चीनच्या कारवाया
दक्षिण चीन समुद्रात चीन सैन्यतळ निर्माण करत आहे. तसेच क्षेपणास्त्रs आणि इलेक्ट्रॉनिक युद्धप्रणाली तैनात केली जात आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने संबंधित क्षेत्रातील गस्त वाढविली आहे. चीनने अलिकडेच स्प्रेटली बेटसमुहातील फियरी क्रॉस रीफवर विमान तैनात केले होते.









