कोल्हापूर / प्रतिनिधी
पेरुचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱया नराधम तरुणास जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. 1 एस. आर. पाटील यांनी 10 वर्ष सक्त मजूरी व 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ओंकार उर्फ बंड्य़ा भूकंप आनंदा दाभाडे (वय 23 रा. कोल्हापूर) असे त्याचे नांव आहे. सरकारी वकील म्हणून ऍड. मंजुषा पाटील यांनी काम पाहिले. 15 सप्टेंबर 2018 रोजी ही घटना घडली होती. याबाबतची फिर्याद पिडीतीच्ये आजीने दिली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, पिडीत चिमुरडी व ओंकार दाभाडे हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. पिडीत मुलगी 4 थीमध्ये शिकत होती. गणपतीच्या सुट्टीमुळे ती घरी एकटीच होती. 15 सप्टेंबर 2018 रोजी दुपारी 10.30 वाजण्याच्या सुमारास ओंकार पिडीत घरी एकटीच असल्याचे पाहून तिच्या घरी आला. त्याने पिडीतेवर पेरुसाठी 5 रुपये देण्याच्या बहाण्याने अत्याचार केला. याची माहिती पिडीतेने आपल्या आजीला दिली. आजीने याबाबतची तक्रार नजीकच्या पोलीस ठाण्यामध्ये दिली. यानुसार ओंकार दाभाडे याच्यावर बाल लैंगिक अत्याचार कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक अनिता मेनकर यांनी करुन दाभाडे विरोधात न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. 1 एस. आर. पाटील यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. सरकारी पक्षातर्फे 11 साक्षीदार तपासण्यात आले. पिडीत मुलगी, फिर्यादी, पंच, साक्षीदार, डॉक्टर संदेश आडमुळे यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या तसेच सरकारी वकील ऍड. मंजुषा पाटील यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य मानून न्यायालयाने ओंकार दाभाडे यास दोषी ठरवले. त्याला 10 वर्षे सक्त मजुरी व 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतील 40 हजार रुपयांची रक्कम पिडीत मुलीस देण्याचे आदेशही यावेळी न्यायालयाने दिले. पैरवी अधिकारी शाम बुचडे, सहाय्यक फौजदार सुरेश परीट, यांनी या खटल्यामध्ये मोलाची मदत केली.








