वार्ताहर/हंचिनाळ :
येथील विठ्ठल मंदिरानजीक असलेल्या अंगणवाडी क्रमांक 73 शाळेच्या इमारतीचा काही भाग दोन महिन्यापूर्वी कोसळल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून अंगणवाडीचे वर्ग मंदिरामध्ये भरविण्यात येत आहेत. असे असतानाही प्रशासनाने अंगणवाडी दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांतून तीव्र नाराजी व्यक्त होत असून, या अंगणवाडीची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
अतिवृष्टीनंतर येथील अंगणवाडी क्रमांक 73 इमारतीवर शेजारील भिंत कोसळल्यामुळे अंगणवाडीच्या इमारतीचा काही भाग पडला. त्यामुळे अंगणवाडी धोकादायक बनल्याने सदर अंगणवाडीतील वर्ग विठ्ठल मंदिरामध्ये भरण्यात येत आहेत. या घटनेला दोन महिने होऊनही अंगणवाडीची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. याकडे संबंधित सीडीपीओ कार्यालयल आणि ग्रामपंचायत यांचे दुर्लक्ष झाल्यामुळे विद्यार्थ्यांना मंदिरात शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे याठिकाणी लवकरात लवकर नूतन अद्यावत अंगणवाडीची उभारणी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.









