गेल्या शंभर वर्षांत प्लास्टीक नामक पदार्थाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. त्याचे जितके उपयोग आहेत, तितकेच दुष्परिणामही आहेत. किंबहुना अलीकडच्या काळात प्लास्टीकचे दुष्परिणामच अधिक अनुभवास येत असल्याने त्यावर अनेक देशांनी बंदी घातली आहे. भारतातही विशिष्ट प्रकारच्या प्लास्टीकवरती बंदी आहे. प्लास्टीकचे सर्वात मोठे वैगुण्य म्हणजे ते नैसर्गिकरीत्या विघटित होत नाही. त्यामुळे त्याचा कचरा हजारो वर्षे टिकून राहू शकतो. त्यामुळे तो पर्यावरणाला धोकादायक असतो. अनेक लोक अशा नष्ट न होणाऱया प्लास्टीकपासून वेगवेगळय़ा उपयोगी वस्तू बनविण्यासाठी संशोधन करीत आहेत. काहींना यशही मिळाले आहे.

भारतातील अशाया नामक कंपनीने चिप्सच्या प्लास्टीक पॅकेट्सपासून चष्म्याच्या केसीस बनविण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या कंपनीचे सहसंस्थापक अनिश मालपानी हे असून त्यांनी नुकताच एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. केवळ चष्म्याच्या केसीस नव्हे तर त्याची भिंगेही या प्लास्टीकपासून बनविली जात आहेत. या कंपनीने ‘विदाऊट’ नामक सनग्लासेसची एक रेंज बाजारात उतरविली आहे. हे चष्मे आणि गॉगल्स किफायतशीर असण्याबरोबरच मॉडर्न लुकचेही आहेत. हे तंत्रज्ञान जगात कोणत्याही कंपनीकडे नाही, असे प्रतिपादन मालपानी करतात. असा शोध भारतात आपण लावल्याबद्दल आपल्याला सार्थ अभिमान वाटतो, असेही त्यांचे म्हणणे आहे. प्लास्टीकचा पुनउपयोग ही महत्त्वाची समस्या बनली असून त्यावर तोडगा काढण्याचे काम आपली कंपनी करीत आहे. या उत्पादनांना चांगला प्रतिसादही मिळत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
हा व्हिडिओ पाहून हजारो लोक या कंपनीची प्रशंसा करीत आहेत. अशा तंत्रज्ञान विकासाला सर्वांनीच पाठिंबा द्यायला हवा, अशा पोस्ट्स प्रसिद्ध होत आहेत. लोकांनीही असे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी बुद्धिवान तंत्रज्ञांना आर्थिक साहाय्य करावे, असे आवाहन काही जणांनी केले आहे. आता मालपानी यांनी अन्य काही सहकाऱयांबरोबर पुण्यामध्ये ही स्टार्टअप् कंपनी सुरू केली आहे.









