हुमरमळा, पाट, माडय़ाचीवाडीत गटाराचे पाणी रस्त्यावर : सार्वजनिक बांधकामच्या कार्यपद्धतीवर नाराजी
प्रतिनिधी / कुडाळ:
सिंधुदुर्ग (चिपी-परुळे) विमानतळ सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, विमानतळावरुन मुंबई-गोवा महामार्गाला जोडणाऱया कुडाळ-पिंगुळी-पाट-परुळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
हुमरमळा, पाट व माडय़ाचीवाडी येथे वाडी-वस्तीत जाण्यासाठी ग्रामस्थांनी गटार बुजवून येण्या-जाण्यासाठी रस्ता तयार करून पाणी रस्त्यावर सोडल्याने रस्ता खड्डय़ांतच गेला आहे. हे गटार सार्वजनिक बांधकाम विभाग खुले करीत नाही, तर ग्रा. पं. ती स्थानिकांना पाठिशी घालत आहेत.
सिंधुदुर्ग विमानतळासाठी आय. आर. बी. कंपनीने कोटय़वधी रु. खर्च केले. विमानतळ डिसेंबर अखेरपर्यंत सुरू करण्यासाठी कंपनी सर्व पातळींवरुन प्रयत्न करीत आहे. यापूर्वी विमानतळ पाहणीसाठी आलेल्या समितीने कुडाळ-पाट-परुळे विमानतळ या मुख्य रस्त्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. मात्र, त्या रस्त्याबाबत शासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने गांभीर्याने घेतले नाही.
रस्ताच गेला खड्डय़ात!
हुमरमळा येथील वळणावर दोन ठिकाणी वस्तीकडे जाण्यासाठी रस्ते तयार करण्यात आले असून पाण्याचे गटार तेथील ग्रामस्थांनी बुजवून रस्ता तयार केला. तेथे ग्रा. पं. किंवा संबंधित ग्रामस्थांनी गटाराला पाईप घालणे आवश्यक होते. मात्र, तसे न करता पाणीच रस्त्यावर वळविल्याने डोंगर भागातून मोठय़ा प्रमाणात येणारे पाणी रस्त्यावरुन वाहते. त्यामुळे मोठे खड्डे तेथे पडले असून वारंवार अपघातही होत आहेत. तसेच पुढे गेल्यानंतर एका रस्त्याच्या गटाराचे पाणी मुख्य गटारात जाण्याऐवजी रस्त्यावर येत असल्याने खड्डे पडले आहेत. स्थानिक राजकीय पुढारी मात्र याकडे दुर्लक्ष करून आहेत. रामेश्वर मंदिर चढावाच्या पुढे नव्याने सुरू करण्यात आलेल्या दुकानदारानेही गटार बुजवून पाणी रस्त्यावर सोडल्याने तिथेही रस्ता खराब होऊन खड्डे पडले आहेत. हुमरमळा ग्रा. पं. ने याकडे लक्ष देऊन संबंधितांना सूचना देणे आवश्यक आहे.
रस्ता वाहतुकीस अयोग्य!
माडय़ाचीवाडी शाळा दरम्यानच्या वळणावर तेथील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने खोदलेला गटार बुजवून आपली वाहने घरी नेण्यासाठी रस्ता तयार केला आहे. त्यामुळे त्या भागातील पाणी थेट रस्त्यावर सोडले आहे. त्यामुळे संपूर्ण रस्ताच खड्डय़ात गेला आहे. पाट-पेंडुरकर थांबा व पिंगुळी कौल फॅक्टरीच्या नजीक लोकांनीच पाण्याचे मार्ग बंद केल्याने रस्ता वाहतुकीस अयोग्य बनला आहे.
खड्डे तात्काळ बुजवावेत!
विमानतळाकडे जाणाऱया रस्त्याच्या दुरवस्थेकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केला असल्याने रोज शेकडो वाहनधारकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. खड्डे तात्काळ बुजवावेत. तसेच रस्त्यावरून वाहणारे पाणी गटार खोदून सोड्नावे, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.









