नागरी विमान वाहतूक समितीच्या बैठकीत अहवाल सादर
प्रतिनिधी / कुडाळ:
केंद्रीय वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सिव्हिल एव्हिऐशन समितीच्या बैठकीत चिपी विमानतळाबाबतचा अहवाल सादर करण्यात आला. त्या अहवालाबाबत हवाई वाहतूक मंत्री शिंदे यांनी आढावा घेतला असता, सिंधुदुर्ग विमानतळाला परवाना देण्याची प्रक्रिया अंतिम पातळीवर असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, गणपतीपूर्वी परवाना देणार की, भाजप-शिवसेनेमधील वादाचे राजकारण आड येणार?, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
कोणत्याही परिस्थितीत विमानतळ चतुर्थीपूर्वी सुरू व्हावा, अशी अपेक्षा सिंधुदुर्गवासियांकडून व्यक्त होत आहे. यात कोणी राजकारण आड आणल्यास त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत.
भारतीय विमान प्राधिकरण आणि नागरी उड्डाण महासंचालनालय यांनी सिंधुदुर्ग विमानतळाची प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यांच्या सूचनेनुसार सिंधुदुर्ग विमानतळाची विकासक कंपनी आयआरबीने रनवेचे काम पूर्ण करून घेतले. त्यानंतर नागरी उड्डाण महासंचालनालय (डिजीसीए) ला आयआरबीने अहवाल सादर केला. या अहवालानंतर 26 व 27 जुलै 2021 रोजी डीजीसीएच्या पथकाने सिंधुदुर्ग विमानतळाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्या पाहणीत विकासकाला दिलेल्या सूचनेनुसार रनवेचे काम केलेले दिसून आले. तो प्रस्ताव डीजीसीएकडे प्राप्त झाला. याबाबत केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री शिंदे यांनी शुक्रवारी एव्हिएशन कमिटीच्या बैठकीत आढावा घेतला. दरम्यान, त्या प्रस्तावानुसार सिंधुदुर्ग विमानतळाला परवाना देण्याची कार्यवाही प्रगतिपथावर असल्याचे सांगण्यात आले.
गणेशोत्सवा दरम्यान विमानतळाला परवाना-राऊत
नागरी उड्डाण महासंचालनालयामार्फत चिपी विमानतळाच्या परवान्याबाबत कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. एव्हिएशन कमिटीची शुक्रवारी दिल्लीत बैठक झाली. गणेशोत्सवादरम्यान चिपी विमानतळाला परवाना मिळण्याची शक्मयता आहे. त्यासाठी आपला पाठपुरावा सुरू असल्याची माहिती एव्हिएशन कमिटी सदस्य तथा खासदार विनायक राऊत यांनी दिली.









