चिपळूण / प्रतिनिधी
सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने चिपळूण शहरावर पुराचे संकट कोसळले आहे. वाशिष्ठी, शिवनदीला आलेल्या पुराने चिपळूण बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे. शिवाजी चौक, पूजा टॉकिजपर्यंत पाणी आहे. बाजारपूल पाण्याखाली गेला आहे. चिपळूण शहरातील मध्यवर्ती बसस्थानकपर्यंत पाणी शिरले आहे. त्यामुळे बसस्थानकातील सर्व एसटीच्या गाड्या बाहेर काढण्यात आल्या आहेत.
चिपळूण शहरातील वडनाका, चिंचनाका, पेठमाप अशा भागात मोठ्या प्रमाणात पाणी घुसले आहेत. सांस्कृतिक केंद्राला पुराचा वेढा पडला आहे. वाशिष्ठीने धोक्याची पातळी ओलांडल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील बहादूरशेख नाका येथील वाशिष्ठी नदीवरील पूल रात्रीपासून अद्यापही वाहतुकीसाठी बंद आहे. यामुळे वाहतूक गुहागर बायपास रोडकडून वळविण्यात आली आहे. चिपळूण शहरातील व्यापाऱ्यांचे, नागरिकांचे या पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महसूल, नगरपालिका प्रशासन सतर्क झाले आहे.









