मुंबई \ ऑनलाईन टीम
मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. काही नेतेमंडळी पूरग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. प्रत्येकाला हा दौरा करण्याचा अधिकार आहे. आम्हीही विरोधात असताना दौरे केले. पण त्यावेळी जिल्हाधिकारी कुठे आहे, तहसीलदार कुठे आहे, प्रांत कुठे आहे, याची विचारणा करत बसलो नाही. मात्र काही लोक पूरग्रस्तांच्या पाहणीसाठी येतात की अधिकाऱ्यांना बघण्यासाठी येतात हा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांबाबत एवढ्या खालच्या स्तराची भाषा कधीही वापरली नव्हती, असं अजित पवार म्हणाले.
नारायण राणे यांनी अधिकाऱ्यांना सुनावण्यासंबंधी तसंच फडणवीसांनी अधिकाऱ्यांना उपस्थित न राहण्यासंबंधी सूचना दिल्या होत्या असा आरोप करण्यासंबंधी प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले की, मी आरोप करणाऱ्यांना उत्तर देण्यास मोकळा नाही. जेव्हा एखाद्या ठिकाणी जाता तेव्हा प्रोटोकॉलप्रमाणे जिल्हाधिकारी, इतर काम करणारी टीम मुख्यमंत्र्यांकडेच गेली पाहिजे. कोणीही मुख्यमत्री असलं तरी असंच होणार. अशा संकटाच्या काळात पक्षीय वाद, मतभेद मधे आणायचे नसतात. आम्हीदेखील पाच वर्ष सरकारमध्ये नव्हतो. त्यावेळीही संकंट आली की जायचो. आम्ही कधीही जिल्हाधिकारी, प्रांतिधिकारी कुठे आहेत अशी विचारणा केली नाही. अरे तुम्ही त्यांना पहायला आला आहात की पाहणी करण्यासाठी आला आहात. तुम्हाला सांगायचं असेल तर पाहणी केल्यावरही सांगू शकता,” असंही यावेळी ते म्हणाले.
काही लोकांनी मुख्यमंत्र्यांना अरे तुरे शब्द वापरले. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. अनेक मोठे व्यक्ती राज्याचे मुख्यमंत्री झाले. यांच्या काळात कधीही कोणीही, विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत अनुद्दार काढले नव्हते, असं सांगत अजित पवारांनी विरोधकांवर निशाणा साधला.
नारायण राणे नेमके काय म्हणाले होते ?
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चिपळूण दौऱ्यात फोन करुन जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही उपस्थित का नाही असा सवाल केला होता. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात व्यस्त असल्याचं म्हटलं होतं. त्यावरुन नारायण राणेंनी “तो सीएम बीएम गेला उडत. आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका” अशी भाषा वापरली होती.