चिपळूण/प्रतिनिधी
कोकणात रात्रभर झालेल्या ढगफुटीमुळे चिपळूण जलमय झालं आहे. चिपळूण मधील अनेक गावात फुटांपेक्षा अधिक पाणी आहे. पावसामुळे तालुक्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. एकूण परिस्थिती पाहता खासदार विनायक राऊत यांनी चिपळूण आणि रायगड जिल्ह्यात महाडला मदत करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच मदतीसाठी हेलिकॉप्टर आणि कोस्टगार्ड देण्याची मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. चिपळूणमध्ये पाच हजाराहून अधिक लोक अडकून पडले आहेत. तर अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
वाशिष्ठी, शिवनदीच्या पुराच्या पाण्याची पातळी वाढली
अति मुसळधार पावसामुळे वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहरातील अनेक भागात पाणी साचले असून अंतर्गत मार्ग बंद झाले आहेत. यामुळे २००५ ची पुनरावृत्ती होते की काय अशी भीती नागरिकांना लागून राहिली आहे. शहरातील बाजारपेठ, खेर्डीमध्ये पाच फुटांपेक्षा जास्त पाणी शिरले आहे. दोन्ही बाजारपेठा पाण्याखाली आहे. शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. दरम्यान एनडीआरएफची तुकडी पुण्याहून चिपळुणात दाखल झाली आहे.
२००५ च्या पुनरावृत्तीची भीती
२६ जुलै २००५ ला ढगफुटी झाल्यामुळे चिपळूण शहरात आणि खेर्डी बाजारपेठेत पाणी साचले होते. कोट्यवधींची हानी झाली होती. यावर्षीही तशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान हवामान खात्याने चार दिवस हाय अलर्ट राहण्याचा इशारा दिल्यामुळे आणि सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने व्यापाऱ्यांनी नुकसान टाळण्यासाठी आवश्यक त्या उपायोजना केल्या होत्या.
कोकण रेल्वेला फटका
मुसळधार पावसामुळे रत्नागिरी विभागातील चिपळूण आणि कामठे स्थानक दरम्यान वशिष्ठ नदी पुलाची पातळी धोक्याच्या पातळीपेक्षा वर गेली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या विभागातील रेल्वे सेवा तात्पुरती स्थगित केल्या आहेत.