मुंबई / ऑनलाईन टीम
चिपळूण येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दौरा सूरु असताना भास्कर जाधव यांनी आपत्तीग्रस्त महिलेसोबत अरेरावी केल्याचे व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरुन सोशल मीडियावर चांगलीच टीका होत आहे. यावर वादावर भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
या व्हिडीओमध्ये आपत्तीग्रस्त महिला मुख्यमंत्री ठाकरे यांना काहीही करुन आम्हांला जगवा, आमदारांचा सहा महिन्याचा पगार नाही दिला तरी चालेल पण आम्हांला मदत करा, अशी विनंती केली. भास्कर जाधव यांनी या महिलेच्या मुलाला आईला समजाव असं सांगतानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. दरम्यान या वादावर भास्कर जाधव यांनी एका मराठी वृत्त वाहिनीशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
भास्कर जाधव म्हणाले की, लोकांना मदत करणं हाच माझा प्राथमिक हेतू आहे. कालही मला लोकांना मदत करायची होती. ती महिला माझ्या मुलीसारखी होती. तिच्यासोबत किंवा माझ्या नातू किंवा भाच्यासारख्या असणाऱ्या मुलासोबतही मी बोलायचं नाही आणि तेसुद्धा कोणत्यातरी चॅनेलच्या प्रतिनिधीला विचारुन बोलायचं असेल तर काम कऱणं कठीण आहे. पण माझा हेतू मदत करणे असताना ज्यांनी मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना योग्यवेळी उत्तर देईन, असा इशाराही त्यांनी दिला.