प्रतिनिधी/ चिपळूण
जिल्हय़ात वाढत असलेल्या कोरोना रूग्णाच्या संख्येला पळून आलेले चाकरमानी कारणीभूत ठरत आहेत. गेल्या 10 दिवसांत चिपळुणात 150 चाकरमानी मुंबई व पुणे येथून चोरटा प्रवास करून आले आहेत. त्यांनी येण्यासाठी आंबा, औषधे वाहतूक करणाऱया वाहनांचा आधार घेतला आहे. त्यामुळे संबंधित चालक, वाहनांचे मालक व कशेडी येथे त्यावेळी सेवा बजावणारे पोलीस यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, येथे आलेल्या सर्व चाकरमान्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.
गेल्या दीड महिन्यापासून सर्वत्र कोरोनाची भीती निर्माण झाली आहे. काही दिवस मागे जाता या रोगावर नियंत्रण मिळवण्यात प्रशासकीय यंत्रणेला यश आले होते. असे असतानाच राजकारण्यांनी मतांची आकडेमोड करताना कोकणातील चाकरमान्यांना गावाकडे आणले जाईल, त्यांना येथे कोणताही त्रास होणार नाही, अशा घोषणा करण्यास सुरूवात केली. याचाच गैरफायदा अनेक चाकरमानी घेत असून त्यांच्यामुळे जिल्हय़ात कोरोनाचे रूग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे याचे खापर राजकारण्यांच्या माथी मारले जात आहे.
चिपळूणचा विचार करता दहा दिवसांत 150 चाकरमान्यांनी चोरटा प्रवास केला आहे. यातील एक कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्याने सध्या खांदाटपाली परिसर सील करण्यात आला आहे. या चाकरमान्यांना सध्या पेढांबे येथे क्वॉरंटाईन, तर काहींना होमक्वॉरंटाईन करण्यात आले आहे. पेढांबे येथे 44 जण, तर 659 जण तालुक्यात होमक्वॉरंटाईन आहेत. तसेच कोरोनाबाधिताच्या आईसह बहीण, भाची व अन्य एक कामथे येथे आयसोलेटमध्ये आहेत. 50 जणांचे नमुने तपासणीसाठी मिरज येथे पाठवण्यात आले असून त्यांच्या अहवालांची प्रतीक्षा आहे.
विशेष म्हणजे येथे चोरटय़ा पध्दतीने आलेल्या व्यक्तींनी आपले नातेवाईक मृत झाले आहेत, अशी खोटी कारणे सांगत दुचाकीवरून प्रवास केला आहे, तर अनेकांनी आंबा, औषधे वाहतूक करणाऱया वाहनांचा आधार घेतल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. यासाठी संबधित चालकांनी हजारो रूपये लाटले आहेत. त्यामुळे त्यांच्यासह गाडी मालकांवर कारवाई करून अशा वाहनांचा परवाना रद्द करण्याची मागणी होत आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे खेड तालुक्यातील कशेडी घाटात 24 तास तपासणी नाका सुरू आहे. येथे पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात असतात. असे असतानाही वरील वाहनांमधून चाकरमान्यांचा प्रवास झालाच कसा, येथे वाहने तपासली जातात की नाहीत, असे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत असून हा प्रवास झाल्यावेळी सेवेत असलेल्यांवर कारवाईची मागणीही होत आहे.
पळून आल्यावर घरी जाऊ नका!
कशेडी घाटात तपासणीनाका असतानाही चाकरमानी येतातच कसे, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. तरीही पळून येणाऱया चाकरमान्यांनी थेट घरात न जाता पेढांबे येथे क्वॉरंटाईन व्हावे, योग्य त्या तपासण्या करून त्यांना घरी सोडले जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे….









