चिपळूण
नोकरीच्या आमिषाने अल्पवयीन तरुणीला वेश्या व्यवसायास भाग पाडून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार पुढे आल्यानंतर याप्रकरणी शहरालगतच्या खेर्डी येथील एका रिक्षाचालकाला चिपळूण पोलिसांनी शनिवारी अटक केली. या रिक्षाचालकाच्या चौकशीतून काही खळबळजनक माहिती पुढे येण्याची शक्यता आहे.
याप्रकरणी आश्रफ हुसेन चौघुले (38, खेर्डी मोहल्ला) असे अटक केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. यापूर्वी मोहम्मद वसीम दुवाबक्ष शेख (35, मूळ-कोलकता, सध्या-खेर्डी बाजारपेठ) याच्यावर पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. मोहम्मद याची पीडित तरुणाच्या बहिणीशी ओळख असल्याने याचा गैरफायदा घेत त्याने तिच्या लहान बहिणीला नोकरीच्या आमिषाने लॉजमध्ये नेऊन त्याच्यासह त्याच्या ओळखीच्या इतर लोकांनी वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार पुढे आला आहे.
याप्रकरणी पोलीस चौकशीतून आश्रफ याचे नाव पुढे आल्यानंतर पोलिसांनी त्याला शनिवारी ताब्यात घेत अटक केली आहे. आश्रफ हा पीडित तरुणीला आपल्या रिक्षातून घेऊन ग्राहकांपर्यंत सोडत होता. इतकेच नव्हे तर ग्राहक मिळवण्यासाठी तो पुढाकार घेत असल्याची माहिती पुढे येत आहे. चौघुले याची पोलिसांनी चौकशी सुरु केली असून या वेश्या व्यवसाय प्रकरणी काही खळबळजक माहिती पुढे येण्याची शक्यता आहे. त्याला रविवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.









