पाच महिलांचे दागिने चोरल्याची कबुली
चिपळूण
दोन महिन्यापूर्वी शहरात लागोपाठ झालेल्या पाच मंगळसूत्र चोऱयांचा छडा चिपळूण पोलिसांनी लावला आहे. उच्चशिक्षीत असलेल्या निदा अन्वर मनियार (36, शिरळ-चिपळूण) याला याप्रकरणी अटक करण्यात आली असून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्याकडून 3 लाख 26 हजार 210 रुपये किंमतीचे 186 गॅम वजनाचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
याबाबत उपविभागिय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, निदा मनियार याने नोव्हेंबर व डिसेंबर शहरात रस्त्याने ये-जा करणाऱया महिलांची मंगळसूत्रे लांबवली आहेत. याप्रकरणी संबंधित महिलांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करून चोरटय़ाच्या शोधासाठी दोन पथके तैनात करण्यात आली होती. पाच ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज, तसेच माहितीच्या आधारे त्याचे छायाचित्र तयार करण्यात आले होते.
सी.सी.टी.व्ही. फुटेजवरून मिळालेल्या माहितीवरून नव्यानेच लाँच झालेल्या ऍप्रिलिया दुचाकीवरुन मनियार एकटाच या चोऱया करत असल्याचे स्पष्ट झाले होते. त्याच्यापर्यंत पोहचण्यासाठी या दुचाकीचा शोध घेण्यात आला. मनियार याच्या या दुचाकीचे आर.टी.ओ.चे रजिस्ट्रेशन करण्यात आलेले नव्हते. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मनियारच्या हालचालीवर दोन दिवस लक्ष ठेऊन त्याचे मोबाईल नंबर तसेच सी.डी.आर. माहिती घेऊन त्याला 25 डिसेंबर रोजी ताब्यात घेतले.
चौकशीअंती त्याने शहरातील लागोपाठ झालेल्या पाच मंगळसूत्र चोऱयांची कबुली त्याने दिली आहे. चोरी केलेली मंगळसूत्र मुंबईतील विविध सोनाराकडे दिल्याचेही त्याने सांगितले. या पाच चोऱयांमध्ये 186 गॅम वजनाचे 3 लाख 26 हजार 210 रुपये किंमतीची मंगळसूत्रे पोलिसांनी हस्तगत केली आहेत.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुढे, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, उपविभागिय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, चिपळूण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक समद बेग, पोलीस नाईक संतोष शिंदे, गगनेश पटेकर, योगेश नार्वेकर, अजित कदम, आशिष भालेकर, पंकज पडेलकर, पोलीस मित्र सागर चोरगे आदींच्या पथकाने केली आहे.
चोरीनंतर चोरटा खात होता पिझ्झा
मनियार हा प्रत्येक चोरीनंतर आलिशान हॉटेलमध्ये जाऊन चमचमीत जेवणावर ताव मारत असे. अनेकदा तो पिझ्झा खाण्याला अधिक पसंती देत असल्याची माहिती सीसीटीव्ही फुटेजवरुन उपलब्ध झाली आहे.
मनियार हा उच्चशि†िक्षत असून त्याने या पाच चोऱया पहिल्यांदाच केल्या होत्या. आरामदायी जीवन जगण्यासाठी तसेच कर्जापोटी या चोऱया केल्याचे त्याने सांगितले आहे. यापूर्वी तो मेडिकलही चालवत होता, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.









