प्रतिनिधी / चिपळूण
दोन बैलांची बेकायदा वाहतूक करणार्या चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता 23 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
जेजेराम तुकाराम वायभट, संभाजी मारूती मुळ्ये, विश्वजित भालचंद्र गिरे, शौकत हबीब तांबोळी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या चौघांनी पेंढाबे येथील एका व्यक्तीकडून दोन बैल खरेदी करून त्यांची बोलेरो गाडीतून बेकायदा वाहतूक करण्याचा प्रयत्न केला. मात्र येथील सुनील वरक व त्यांच्या मित्रांनी त्यांचा पाठलाग करून ही गाडी अलोरे-शिरगाव पोलिसांना पोफळी नाका येथे पकडून दिली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल बी. एस. कोळेकर यांनी पंचनामा करून दोन बैलांसह बोलेरो, दोन दुचाकी असा लाखो रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर या चौघांना अटक करण्यात आली. सध्या ते पोलीस कोठडीत असून त्यांना 23 ऑक्टोबर रोजी पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.
दरम्यान, गेल्या पंधरा दिवसांतील ही तिसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वी चिपळूण पोलिसांनी दळवटणे व बहाद्दूरशेख नाका येथे प्रत्येकी 15 बैलांची वाहतूक करणारा कंटेनर व आयशर टेम्पो पकडून अनेकांना अटक केली. त्यांनाही काही दिवस पोलीस कोठडीत मिळाली. त्यामुळे हा व्यवसाय करणार्यांमध्ये खळबळ उडाली असून त्यांनी आता वाहतुकीची वेळ बदलल्याची माहिती पुढे येत आहे.