तालुक्याचा आकडा 451वर, पोलीस दलातील भीतीत होतेय वाढ
प्रतिनिधी/ चिपळूण
गुरूवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार शिरगाव पोलीस स्थानकातील कर्मचाऱयासह 13 जणांना लागण झाली आहे. त्यामुळे तालुक्याचा आकडा 451वर गेला असून शहरात 223 रूग्ण झाले आहेत. येथे तीन पोलिसांना बाधा झाल्याने अधिकारी, कर्मचाऱयांमधील भीती वाढत चालली आहे.
तालुक्यात दरदिवशी काही प्रमाणात कोरोनाचे रूग्ण वाढत चालले आहेत. गुरूवारी सायंकाळी आलेल्या अहवालानुसार शिरगाव येथील एका कर्मचाऱयाला लागण झाली आहे. यापूर्वी याच पोलीस स्थानकातील एकासह चिपळूण पोलीस स्थानकातील वाहतूक पोलिसाला लागण झाली आहे. त्यामुळे पोलीस बाधितांची संख्या तीनवर गेली आहे. सध्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱयांचे नमुने घेण्याचे काम सुरू आहे. तसेच 13 नव्या रूग्णांमध्ये खेर्डी, काविळतळी, पाग, ओझरवाडी येथील प्रत्येकी 1, खेंड, मिरजोळीत प्रत्येकी 3, गोवळकोट येथे 2 रूग्णांचा समावेश आहे.
शहरात 227जणांना लागण झाली असून त्यातील 144जण बरे झाले आहेत. 76 जणांवर उपचार सुरू असून 7 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात सध्या 58 कंन्टेनमेंट झोन आहेत. तालुक्यातील अनेक गावांमध्ये 224 रूग्ण सापडले असून त्यातील 159जण ठणठणीत झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 59 रूग्णांवर उपचार सुरू असून 6जणांना जीव गमवावा लागला असून ग्रामीण भागात 45 कन्टेमेन्ट झोन आहेत. आतापर्यंत 2785 जणांची तपासणी झाली असून त्यातील 215 जणांचे अहवाल येणे बाकी आहे. शहरातील रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 63.44 टक्के, ग्रामीण रूग्णांचे 70.98 टक्के तर तालुक्याचे एकूण प्रमाण 67.18 टक्के आहे.









